अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे:गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आयोजित नियोजन बैठक संपन्न..
⚡कुडाळ ता.२८-: गणेशोत्सव काळात कुडाळ तालुक्यात सर्व विभागाकडून सुयोग्य सेवा देण्यात येईल, अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज येथील मराठा समाज हॉल येथे गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आयोजित कुडाळ तालुका नियोजन बैठकीत दिली.
यावेळी कुडाळच्या पोलिस निरीक्षक वृणाल मुल्ला, कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अक्षता खटावकर, कुडाळ एसटी आगाराचे प्रभारी व्यवस्थापक संदीप पाटील, नायब तहसीलदार चव्हाण, महावितरणचे अभियंता पाटील, कुडाळ रेल्वेस्थानक अधिकारी सामंत, महामार्ग प्राधिकरण अधिकारी, कुडाळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विजय चव्हाण, कुडाळ शहरातील व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पदाधिकारी, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये येत्या गणेशोत्सव काळामध्ये कुडाळ तालुक्यातील शहरातील नियोजनासंदर्भात प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. कुडाळ तालुक्यात अधिकाधिक घरगुती गणपती असून याबाबत ग्रामपंचायत स्तरावर सुद्धा नियोजन होणे गरजेचे आहे, असे पोलीस निरीक्षक यांनी यावेळी सांगितले. विसर्जन स्थळी सर्व व्यवस्था चोख ठेवण्यासाठी कुडाळ नगरपंचायतने पुढाकार घ्यावा, तसेच याबाबत पोलीस प्रशासनाची आवश्यक तेवढी कुमक देण्यात येईल असेही पुढे कुडाळ पोलीस निरीक्षक यांनी सांगितले. तसेच कुडाळ विसर्जन स्थळी निर्माल्य कलश ठेवण्यात येईल अशी माहिती देण्यात आली. कुडाळच्या भंगसाळ नदीत मगरी असून त्यादृष्टीने योग्य ती काळजी घेण्यात यावी, अशी सूचनाही करण्यात आली.
एसटी प्रशासन चोख सेवा देणार
एसटी बसस्थानक हे शहराच्या मध्यवर्ती असून येथे वाहतूक कोंडीची समस्या नेहमीच जाणवत असते. त्या अनुषंगाने कुडाळ एसटी आगाराचे प्रभारी व्यवस्थापक संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सव काळात कुडाळ बसस्थानक येथे अधिक कर्मचाऱ्यांची कुमक तैनात करण्यात येईल. तसेच कुडाळ शहरात येणाऱ्या गाड्या या हॉटेल आरएसएन मार्गे कुडाळ शहरात येऊन मार्गस्थ होतील अशी माहिती दिली. तसेच गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी असल्याने स्वच्छता तसेच रात्रीच्या वेळी लाईट सेवा देण्यात येईल. तसेच प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीचे कर्मचारी कार्यरत असतील. ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. या काळात अन्य विभागातून येणाऱ्या एसटी बसेस या कुडाळ डेपोत थांबवण्यात येतील. कुडाळ एसटी आगारात जवळपास ७० एसटी बसेस मुंबईहून दाखल होणार असून यातील अधिक तर ग्रामीण भागापर्यंत पोहोचणार आहेत. त्यानुसार पुढील दोन दिवसात याबाबतचा पूर्तता अहवाल पोलीस ठाण्याकडे देण्यात येईल, अशी माहिती दिली.
गणपतीनिमित्त मुंबईहून कोकणात येणाऱ्या खाजगी बसेसची संख्या जास्त असते. या बसेससाठी महामार्गालगत थांबे देण्यात येणार आहेत. यामध्ये आरएसएन चौक, काळप नाका यांचा समावेश आहे. यामुळे कुडाळ शहरात वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण होणार नाही.
कुडाळ रेल्वस्टेशन हे गणेशोत्सव काळामध्ये दिवस-रात्र गजबजलेली असल्यामुळे येथे हायमास्ट दिवे लावण्यात येतील. यामुळे चोरीच्या घटना अनुचित प्रकारांना आळा बसेल, अशी माहिती कुडाळ रेल्वेस्थानक अधिकारी सामंत यांनी दिली.
कुडाळ रेल्वे स्थानक येथे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होते. त्यामुळे येथे प्रवाशांना रांगेत सोडण्यात यावे अशी सूचना करण्यात आली. तसेच रेल्वेस्टेशन भागात बॅरिकेट्सचा वापर करून वाहतूककोंडी आणि प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न करावेत अशाही सूचना देण्यात आल्या. याबाबत सूचनांचे पालन करण्यात येईल, असे रेल्वे प्रशसानाकडून सांगण्यात आले.
कुडाळ शहरात पोलिसांची गस्त वाढविणार
या बैठकीत कुडाळ शहर हे मध्यवर्ती असल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी असते. तसेच कुडाळ एसटी स्टँड, रेल्वेस्टेशन येथे प्रवाशांची संख्या अधिक असते. त्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुडाळ पोलिसांची गस्त वाढवा, अशी मागणी स्थानिकांनी केली. याबाबत कुडाळ पोलिस निरीक्षक वृणाल मुल्ला यांनी सकारात्मक भूमिका घेत गस्त वाढविण्यात येईल, असे आश्वासन दिले.
वीज समस्या दूर करणार
कुडाळ तालुक्यात विजेची समस्या कायम असल्याने त्या गणपती काळात सोडवा, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी केली. यावर महावितरणचे अभियंता यांनी गणपती सणात विनाखंडित वीजसेवा देण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच सध्या वीज वाहिन्यांची दुरुस्ती, जुना वीज पोल बदली ही कामे सुरू आहेत, अशी माहिती दिली.
याबाबत कुडाळ शहरातील सिटी सेंटर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याने येथील विक्रेत्यांना कुडाळ नगरपंचायतीने जागा वाटप करून देणे आवश्यक असल्याची चर्चा या बैठकीत झाली. यावेळी कुडाळ पोलीस निरीक्षकांनी याबाबतच्या कुडाळ नगरपंचायत यांना सूचना देताना नो पार्किंग भागात वाहनांना मज्जाव केला असून विक्रेत्यांबाबत नगरपंचायतीने निर्णय घेणे योग्य ठरेल अशा सूचना दिल्या. तसेच जिजामाता चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावर दुतर्फा लावून दुचाकी लावून ठेवण्यात येतात. त्यामुळे वाहतूककोंडी होते. येथे पार्क करून ठेवण्यात आलेल्या दुचाकी हटविण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या. तसेच कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी सुद्धा प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य आवश्यक असेल त्या ठिकाणी देण्यात येईल अशी ग्वाही दिली.
बॉक्सवेलमधील सीसीटिव्ही, लाईट कार्यान्वित करा
महामार्गावरील काळप नाका बॉक्सवेल तसेच राज हॉटेल नजिक येथे असणाऱ्या बॉक्सवेलमध्ये सीसीटिव्ही आणि लाईट नसल्याने येथे अनुचित प्रकार घडू शकतात. याबाबत
महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले.
या बैठकीदरम्यान कुडाळ पोलीस निरीक्षकांनी पुढील दोन दिवसात प्रत्येक विभागाचा पूर्तता अहवाल मागविण्यात येईल अशी माहिती दिली. तसेच कुडाळ तालुक्यात गणेशोत्सव काळात अन्य काही मुद्दे आवश्यक असल्यास त्या लेखी स्वरूपात द्याव्या अशाही सूचना वृणाल मुल्ला यांनी केल्या.
