Headlines

कुर्ली त्रिपुरी पौर्णिमा उत्सवाच्या नियोजनासाठी प्रशासनाची बैठक संपन्न…

वैभववाडी प्रतिनिधी
कुर्ली गावातील प्रसिद्ध त्रिपुरी पौर्णिमा उत्सव व जत्रा येत्या २४ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रेचे योग्य नियोजन करण्यासाठी सभापती सिद्धेश रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी तहसीलदार सूर्यकांत पाटील, पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, जिल्हा परिषद सदस्य रिद्धी सुतार, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, तालुका आरोग्य अधिकारी सौ बिराजदार,एस.टी. महामंडळाचे अधिकारी,उदय पाटील ,महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कुर्ली सरपंच, उपसरपंच,अंबाजी हुबे , दिलीप पाटील पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीमध्ये त्रिपुरी पौर्णिमा उत्सव व जत्रा शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, भाविकांसाठी आरोग्य सुविधा, तसेच वैभववाडी कुर्ली व फोंडा कुर्ली असे दिवसभर एस.टी. बस व्यवस्था तसेच अखंडित वीजपुरवठा याबाबत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून नियोजन करण्यात आले.
कुर्ली येथील त्रिपुरी पौर्णिमा उत्सवाला दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक व ग्रामस्थ उपस्थित राहतात. त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये आणि यात्रा सुरळीत पार पडावी, यासाठी प्रशासन व देवस्थान समितीच्या वतीने आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

You cannot copy content of this page