कामगार क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल गौरव

मालवण दि प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा गावचे सुपुत्र, माजी आमदार, शिवसेना सचिव व प्रवक्ते तसेच राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांना ‘लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’, लंडन, युनायटेड किंगडम या संस्थेतर्फे ‘कामगार क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान’ (आऊटस्टँडिंग कॉन्ट्रिब्युशन टू द लेबर सेक्टर) या श्रेणीतील मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अंधेरी पूर्व येथील शेर-ए-पंजाब जिमखाना सभागृहात नुकताच हा सन्मान प्रदान करण्यात आला.
शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली किरण पावसकर हे कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. कामगारांच्या कल्याणासाठी दिलेले उल्लेखनीय योगदान, कामगार चळवळीतील नेतृत्व तसेच कर्मचाऱ्यांचे हक्क व हितसंबंध जपण्यासाठी केलेले समर्पित प्रयत्न यांची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.किरण पावसकर यांना हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे पदाधिकारी, सदस्य आणि सभासद यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे
