Headlines

बांदा परिसरात २५ हजारांची फायबर केबल चोरी…

तिघा संशयतांची कबुली:, स्विफ्ट कारसह मुद्देमाल जप्त..

⚡बांदा ता.१९-: मळगाव ते बांदा दरम्यान इंटरनेट सेवेसाठी टाकण्यात आलेली ऑप्टिकल फायबर केबल निगुडे-पाटीलवाडी (ता. सावंतवाडी) येथून चोरीस गेल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी तिघांवर गुन्हे दाखल केले. चौकशीदरम्यान त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी २५ हजार रुपये किमतीची चोरीस गेलेली केबल हस्तगत केली. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट कारही जप्त केली आहे.
याबाबत विजय गोविंद सावंत (रा. भटवाडी, सावंतवाडी) यांनी बांदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सावंत यांचा इंटरनेट व्यवसाय असून त्यांनी मळगाव ते बांदा दरम्यान ऑप्टिकल फायबर केबल टाकली आहे. निगुडे-पाटीलवाडी येथील एका पोलवर असलेली अतिरिक्त ऑप्टिकल फायबर केबल ३० ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
या प्रकरणी सावंत यांनी संशय व्यक्त केलेल्या शुभम सुधीर कुडतरकर (वय ३२, रा. कोलगाव), वैभव रामचंद्र सुभेदार (वय ३२) व रतन रामचंद्र सुभेदार (वय २७, दोघेही रा. भटवाडी, सावंतवाडी) यांना पोलिसांनी नोटीस बजावून त्यांचे जबाब नोंदविले. चौकशीदरम्यान तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याने पोलिसांनी चोरीस गेलेली २५ हजार रुपये किमतीची केबल हस्तगत केली. तसेच या गुन्ह्यात वापरण्यात आलेली शुभम कुडतरकर यांच्या मालकीची स्विफ्ट कार (एमएच ०७ एबी १९४८) पोलिसांनी ताब्यात घेतली.
विशेष म्हणजे, तिन्ही संशयित यापूर्वी फिर्यादी सावंत यांच्याकडेच कामाला होते. या प्रकरणाचा पुढील तपास बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार धनंजय नाईक करीत आहेत.
फोटो:-
बांदा पोलिसांनी हस्तगत केलेली फायबर केबल.

You cannot copy content of this page