Headlines

आरोंदा चेकपोस्टवर गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त…

एकावर गुन्हा दाखल:आरोपीकडून ९ हजार ६०० रुपयांच्या ९६ दारूच्या बाटल्या जप्त;

⚡सावंतवाडी ता.१९- : आरोंदा चेकपोस्ट येथे गोवा बनावटीची दारू विक्रीच्या उद्देशाने बेकायदा बाळगल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी आयवान संतान फर्नांडिस (वय ३३, रा. आरोंदा बाजारपेठ) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून सुमारे ९ हजार ६०० रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या ९६ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
गुरुवारी (ता. १९) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आरोंदा चेकपोस्ट येथे पोलिसांनी ही कारवाई केली.

यावेळी आरोपीकडे एका प्लास्टिकच्या गोणीत दोन पुठ्ठ्यांच्या बॉक्समध्ये ‘गोल्डन एस ब्ल्यू’ असे लेबल असलेल्या गोवा बनावटीच्या दारूच्या १८० मिली क्षमतेच्या एकूण ९६ सीलबंद बाटल्या आढळून आल्या. प्रत्येकी १०० रुपये याप्रमाणे या दारूसाठ्याची किंमत ९ हजार ६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना दारू विक्री करण्याच्या उद्देशाने हा साठा बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम ३५ (३) अन्वये नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे, संबंधित आरोपीविरुद्ध यापूर्वीही सावंतवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये २०२१, २०२३ आणि २०२४ मध्ये असे तीन गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरवारी अधिक तपास करीत आहेत. या कारवाईत पोलीस हवालदार बाबुराव नकुळ यांचा सहभाग होता.

You cannot copy content of this page