एकाला पकडले:१० हजारांचा मोबाईल, २ हजार ३०० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त..
⚡सावंतवाडी ता.१९-: सातार्डा येथील श्री देव रवळनाथ मंदिरासमोर कल्याण मटका नावाचा जुगार खेळविणाऱ्या एकावर सावंतवाडी पोलिसांनी कारवाई केली. सत्यवान मंगेश जाधव (वय ५४, रा. सातार्डा, ता. सावंतवाडी) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी (ता. १९) दुपारी १.४० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सत्यवान जाधव हा कल्याण मटका जुगारावर लोकांकडून पैसे स्वीकारून बेकायदेशीररीत्या जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल, २ हजार ३०० रुपये रोख रक्कम, आकडेमोड केलेले कागद आणि एक पेन असा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ च्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम ३५ (३) अन्वये नोटीस देण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश गवस यांनी फिर्याद दिली असून, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टाकेकर तपास करीत आहेत. ही कारवाई सावंतवाडी पोलिसांच्या सातार्डा दूरक्षेत्रांतर्गत करण्यात आली.

