मालवण दि (प्रतिनिधी) :

आचरा समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांची कार वाळूत फसल्याने काही काळ अडचणीची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, स्थानिक ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर आणि त्यांच्या मित्रमंडळाने तत्परतेने मदतीसाठी धाव घेतल्याने पर्यटकांची कार सुखरूप बाहेर काढण्यात आली.
समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी पर्यटकांनी चारचाकी वाहन वाळूत उतरवले होते. किनाऱ्यावरील भुसभुशीत वाळूमध्ये कारची चाके रुतल्याने वाहन पुढे सरकणे अशक्य झाले. पर्यटकांनी स्वतः कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र चाके अधिकच रुतत गेल्याने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.
पर्यटकांची अडचण लक्षात येताच मुजफ्फर मुजावर यांनी मित्रमंडळासह मदतीचा पुढाकार घेतला. टेम्पोच्या सहाय्याने दोरी बांधून कार खेचण्याची व्यवस्था करण्यात आली. योग्य समन्वयातून काही वेळातच कार वाळूतून बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे पर्यटकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
