सिंधुदुर्ग ॲडव्होकेट्स प्रीमियर लीग उत्साहात:पुरुष गटात सिंधुदुर्ग वॉरियर्स, महिला गटात व्हिक्टरी व्हाइब्स विजयी..

कुडाळ : न्यायालयात कायद्याच्या चौकटीत राहून न्यायासाठी युक्तिवाद करणारे वकील क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजी आणि गोलंदाजीचा आनंद घेताना दिसले. वकिली व्यवसायातील धावपळीतून विरंगुळा मिळावा, जिल्ह्यातील वकील बांधवांमध्ये स्नेहभाव, एकोपा आणि खिलाडूवृत्ती वाढीस लागावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग ॲडव्होकेट्स प्रीमियर लीग २०२६ या टर्फ क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत पुरुष गटात सिंधुदुर्ग वॉरियर्स, तर महिला गटात व्हिक्टरी व्हाइब्स संघाने विजेतेपद पटकावले.
अणाव-हुमरमळा येथील पालव टर्फ मैदानावर आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा वकील संघटनेचे माजी अध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. राजीव बिले, जिल्हा वकील संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष विवेक ऊर्फ बंड्या मांडकुळकर, कुडाळ तालुका अध्यक्ष ॲड. गौरव पडते, ॲड. गौरी देसाई यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. ॲड. जान्हवी दुभवडकर यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी ॲड. राजेंद्र रावराणे यांनी कला आणि क्रीडा क्षेत्रातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असल्याचे सांगितले. वकिली व्यवसायातील ताणतणावातून काही काळ बाहेर पडून सहकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी अशा स्पर्धांमुळे मिळते, असे त्यांनी नमूद केले. तर ॲड. राजीव बिले यांनी खेळातून मैत्री, खिलाडूवृत्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो. विजयाचा आनंद घेतानाच पराभवही खिलाडूवृत्तीने स्वीकारण्याची मानसिकता खेळामुळे निर्माण होते, असे सांगितले.
या स्पर्धेत पुरुषांचे आठ आणि महिलांचे दोन असे एकूण दहा संघ सहभागी झाले होते. ब्लॅक कोट ब्लास्टर्स, सेकंड स्टार्स, कणकवली बार असोसिएशन, लिहर किलर्स, सिंधुदुर्ग वॉरियर्स, व्हिक्टरी लाइन्स, सिंधुकन्या, युनायटेड सावंतवाडी, वेंगुर्ला स्टार आणि कोकण स्मॅशर्स या संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला. पुरुष गटात सिंधुदुर्ग वॉरियर्सने, तर महिला गटात व्हिक्टरी व्हाइब्सने विजेतेपद मिळवून स्पर्धेवर आपले नाव कोरले.
स्पर्धेचे आयोजन ॲड. दत्ताराम बिले, ॲड. विनय मांडकुलकर, ॲड. सुयश गवंडे आणि ॲड. सौरव देसाई यांनी केले होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे संघमालक, खेळाडू, ज्येष्ठ विधिज्ञ, सहकारी वकील, प्रेक्षक तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्वांचे आयोजकांनी आभार मानले.
या स्पर्धेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकील बांधवांना न्यायालयीन कामकाजापलीकडे एकत्र येण्याची संधी मिळाली असून, मैत्री, एकोपा आणि क्रीडाभावनेचे नवे व्यासपीठ निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
