⚡वेंगुर्ला ता.१९-: जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर, परुळे येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची उपलब्धता व्हावी, तसेच त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमाला वेंगुर्ला पं. स. उपसभापती सचिन देसाई, म्हापण पं. स. सदस्य विष्णू फणसेकर, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, मच्छीमार नेते वसंत तांडेल, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष प्रसाद पाटकर, जिजाऊ संस्थेचे समन्वयक स्वरूप सावंत, संस्थेचे सदस्य कुणाल निकम, मनोज पंचाळ, शाळेचे विश्वस्त अमेय देसाई, मुख्याध्यापक सचिन देसाई यांच्यासह शिक्षकवृंद, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने योगदान देणाऱ्या जिजाऊ संस्थेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

