‘लोकनेत्री’च्या पहिल्या गटात मानाची निवड; सात दिवसांच्या विशेष प्रशिक्षणासाठी संपूर्ण प्रायोजकत्व

देवगड (प्रतिनिधी )
स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या विद्यमान नगरसेविका सौ तन्वी चांदोस्कर यांनी आता नेतृत्वाच्या व्यापक व्यासपीठावर झेप घेतली आहे. पुण्यात आयोजित प्रतिष्ठित ‘लोकनेत्री – वुमन्स एक्झिक्युटिव्ह लीडरशिप प्रोग्रॅम’च्या पहिल्या गटासाठी त्यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना या सात दिवसीय निवासी प्रशिक्षणासाठी संपूर्ण प्रायोजकत्वासह संधी देण्यात आली आहे.
महिलांचे राजकीय नेतृत्व अधिक सक्षम करण्याबरोबरच सार्वजनिक धोरण, प्रशासकीय कार्यपद्धती आणि विकासकामांमधील त्यांचा सहभाग प्रभावी करण्याच्या उद्देशाने अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी’ आणि श्वेता शालिनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. २० ते २७ नोव्हेंबर या कालावधीत चऱ्होली बुद्रुक येथील विद्यापीठाच्या संकुलात ही कार्यशाळा होणार आहे.
या प्रशिक्षणात तन्वी चांदोस्कर यांच्यासह निवड झालेल्या महिला लोकप्रतिनिधींना वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, धोरणकर्ते, वित्त तज्ज्ञ आणि संवाद तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. नेतृत्व विकास, राजकीय मुत्सद्देगिरी, वाटाघाटी कौशल्य, प्रभावी संवाद, सार्वजनिक वित्त व्यवस्थापन, निधी उभारणी, सीएसआर भागीदारी आणि विकासकामांच्या नियोजनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अशा विविध विषयांचा अभ्यासक्रमात समावेश आहे.
कार्यशाळेची सुरुवात २० नोव्हेंबर रोजी श्वेता शालिनी फाउंडेशनच्या संस्थापिका श्वेता शालिनी यांच्यासोबत विशेष संवादाने होणार आहे. २१ नोव्हेंबर रोजी उद्घाटन सोहळा होणार असून, यावेळी कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
या प्रशिक्षणात केवळ व्याख्यानांद्वारे मार्गदर्शन न करता प्रत्यक्ष विकासकामांचा अभ्यास करण्याची संधीही मिळणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरे बाजार येथे भेट देऊन जलसंधारण आणि ग्रामसभेच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला जाणार आहे. तर २५ नोव्हेंबर रोजी यशदा आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर येथे भेट देऊन धोरणनिर्मिती व प्रशासकीय अंमलबजावणीची प्रक्रिया समजून घेतली जाणार आहे. संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी शासकीय विभागांचे कामकाज आणि योजनांच्या अंमलबजावणीवर विशेष मार्गदर्शन होणार आहे.
‘लोकनेत्री’च्या संचालिका स्नेहा मेहता, शैक्षणिक संचालक प्रा. केदार कुलकर्णी आणि कार्यक्रम समन्वयक गायत्री परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. २७ नोव्हेंबर रोजी प्रकल्प सादरीकरण आणि मार्गदर्शकांशी संवादानंतर कार्यशाळेची सांगता होणार आहे.
लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या कामाची राज्यस्तरीय व्यासपीठावर दखल घेतली जाणे, ही तन्वी चांदोस्कर यांच्या कार्यासाठी महत्त्वाची पावती ठरली आहे. या प्रशिक्षणातून मिळणारे नेतृत्व कौशल्य आणि प्रशासकीय ज्ञान भविष्यातील लोकहिताच्या कामांना नवी दिशा देणारे ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
