अन्यथा नागरिकांना कचरा नगरपालिकेच्या दारात आणून टाकावा लागेल-:आप्पा लुडबे…

*💫मालवण दि.१५-:* मालवण शहरातील कचरा उचल करण्याची यंत्रणा जाणीवपूर्वक बंद करण्यात आली असून यामुळे शहरात कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. याबाबत वारंवार लक्ष वेधुनही नगरपालिका प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिक आपला रोष नगरसेवकांवर काढत आहेत. त्यामुळे ही यंत्रणा पूर्वीप्रमाणे चालू करण्यात यावी अन्यथा नागरिकांना कचरा नगरपालिकेच्या दारात आणून टाकावा लागेल असा इशारा माजी आरोग्य सभापती आणि नगरसेवक आप्पा लुडबे यांनी मालवण नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबतचे निवेदन नगरसेवक आप्पा लुडबे यांनी मुख्याधिकाऱ्यांना सादर केले आहे. मालवण शहरात कचरा उचलण्याची सुयोग्य यंत्रणा मागील तीन वर्षापासून चालु होती. ती हळूहळू जाणीवपूर्वक बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे मालवण शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसत आहेत. शहरातील प्रत्येक घरातून कचरा घेण्यासाठी आजही कर्मचारी घेतलेले आहेत. परंतु त्यांना दिलेले वाहन बंद अवस्थेत आहेत. नागरिकांना कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्यास दंड करण्याची भिती दाखविली जाते. परंतु त्यांच्या घराजवळून कचरा उचलला जात नाही. अशा वेळी नागरिकांनी काय करावे हे त्यांना कळत नाही. कचऱ्याची ही समस्या वेळोवेळी सभागृह तसेच प्रशासनास लोकप्रतिनिधींनी तसेच वृत्तपत्रांनी निदर्शनास आणून दिलेली आहे. परंतु त्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्याचा रोष नागरिक आम्हां लोकप्रतिनिधींवर काढत आहेत, त्यामुळे याप्रश्नी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी आप्पा लुडबे यांनी केली आहे. शहराप्रमाणेच आपल्या वायरी प्रभागातही कचऱ्याची समस्या निर्माण झालेली आहे. तरी ती लवकरात लवकर सोडवावी. जर पुढील पंधरा दिवसात घरस्तरावर कचरा उचलण्याची व्यवस्था पुर्वीप्रमाणे चालू न झाल्यास प्रभागातील नागरिकांना घेऊन घरातील कचरा नगरपालिकेच्या दारात आणून टाकावा लागेल, असा इशाराही लुडबे यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page