Headlines

जि.प. बांधकाम विभागातील बनावट सह्यांचे प्रकरण तापले…

राष्ट्रवादीचा सीईओ दालनात आक्रमक पवित्रा:‘गुन्हे दाखल करा, अन्यथा दालन सोडणार नाही’, अमित सामंत…

सिंधुदुर्गनगरी ता १६
जिल्हा परिषद बांधकाम कार्यकारी अभियंत्यांच्या खोट्या (बोगस) सह्या करून कामांची बिले काढण्याच्या गंभीर प्रकाराबाबत संबंधित सर्व दोषी ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, तोपर्यंत आम्ही आपले दालन सोडणार नाही तसेच आपल्यालाही काम करू देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात ठाण मांडला.

जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या बोगस सह्या करून कामांची बिले काढण्याचा गंभीर प्रकार उघड झाला याचे पडसाद जि प स्थायी समिती सभेत उमटले तर याबाबत पालकमंत्री यांनीही यामागे गॉडफादर असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.तर जिल्हा परिषद प्रशासनावर आरोप करण्यात आले . या प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज मंगळवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ठाण मांडत त्यांना जाब विचारला .
यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी बोगस सह्यांचे प्रकरण उघड होऊनही अद्याप गुन्हा दाखल का झाला नाही. कोणाला वाचविण्यासाठी विलंब केला जात आहे. पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलेला गॉडफादर कोण असे विविध प्रश्न उपस्थित करत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना धारेवर धरले. तर जोपर्यंत संबंधित सर्व दोषींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही दालन सोडणार नाही, आणि तुम्हाला कामही करू देणार नाही. अशी भूमिका घेतली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यासह अनंत पिळणकर, शिवाजी घोगळे, रुपेश जाधव, चंद्रकांत नाईक, महेश चव्हाण, रमेश राणे, नयन गावडे, रवींद्र चव्हाण आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी या घटनेची संपूर्ण माहिती दिली. ज्यावेळी हा प्रकार बांधकाम कार्यकारी अभियंत्यांच्या निदर्शनास आला त्यानंतर त्यांनी तात्काळ याची माहिती दिली, त्याचवेळी तात्काळ चौकशी अधिकारी नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी केली आहे. संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांच्याकडून खुलासा घेतला आहे. आतापर्यंत झालेल्या प्राथमिक चौकशीत १३ कामांच्या बिलावर बोगस सह्या असल्याचे दिसून येत असून यामध्ये एक व्यक्ती दोषी आढळला आहे. संबंधित बांधकाम कार्यकारी अभियंता सुट्टीवर असल्याने गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला विलंब झाला आहे.तरी या प्रकरणाची पोलिसांकडून सखोल चौकशी व्हावी यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या रेकॉर्डसह आज कार्यकारी अभियंता गुन्हा दाखल करणार आहेत असे स्पष्ट केले.
बांधकाम कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत हे आज दीर्घ सुट्टीनंतर हजर झाले आहेत त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळासमोर आपण सुट्टीवर असल्याने गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला असल्याचे मान्य करत या प्रकरणी प्रशासनाकडून प्राथमिक चौकशी पूर्ण झाली आहे. तक्रार दाखल करण्यास अनुमतीहि दिली आहे . त्यानुसार आज रितसर तक्रार दाखल करणार आहे. या प्रकरणाची पोलीस सखोल चौकशी करतील जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल असे स्पष्ट केले .

कोणालाही पाठीशी घालणार नाही

या प्रकरणात दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल. जिल्हा परिषदेत घडलेला प्रकार गंभीर असून यामध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. जे दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन कारवाई होईल. असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी ही अनेक घोटाळे झाले

जिल्हा परिषदेच्या इतिहासात यापूर्वीही अनेक घोटाळे झाल्याचे उघड झाले आहेत. शेगडी, शिलाई मशीन, पौष्टिक आहार,खरेदीत झालेल्या घोटाळ्याचा सूत्रदार सापडलेला नाही . याची आठवण करून देत या प्रकरणाचा तपास योग्य व्हावा . खरा सूत्रदार कोण?हे उघड करून त्याच्यावर कारवाई व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी अमित सामंत यांनी प्रशासनास दिला आहे .

You cannot copy content of this page