⚡कणकवली ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील महिला अत्याचार निवारण कक्षात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या निकिता बाळकृष्ण एडवे यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी बढती करण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
निकिता एडवे यांनी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ पोलीस दलात प्रामाणिकपणे सेवा बजावत विविध ठिकाणी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या त्या ओरोस येथील महिला अत्याचार निवारण कक्षात कार्यरत असून, यापूर्वी त्यांनी कणकवली, बांदा, वैभववाडी, ओरोस तसेच पोलीस मुख्यालय येथे उत्कृष्ट सेवा बजावली आहे.
विशेषतः कणकवली तालुक्यातील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी लोकाभिमुख पोलीस अधिकारी म्हणून नागरिकांचा विश्वास संपादन केला होता. जनतेशी संवाद साधत कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच महिलांशी संबंधित तक्रारींचे संवेदनशीलतेने निवारण करण्यासाठी त्यांची ओळख निर्माण झाली होती.
राज्य शासनाच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदांचा समावेश पोलीस उपनिरीक्षक संवर्गात करण्यात आला आहे. यासाठी पोलीस दलातील ३० वर्षांची सेवा तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरील किमान तीन वर्षांचा अनुभव हे निकष निश्चित करण्यात आले होते. या निकषांची पूर्तता केल्याने निकिता एडवे यांना ही बढती मिळाली आहे.
