युनायटेड अमेरिकन
युनिव्हर्सिटीकडून सन्मान..

⚡मालवण ता.०७-:
मालवण तालुक्यातील मूळ मसुरे येथील आणि सध्या डोंबिवली येथे वास्तव्यास असलेले ज्येष्ठ कवी, गझलकार, गीतकार, लेखक व समीक्षक विजय जोशी (विजो) यांना त्यांच्या गेल्या तीन दशकांतील साहित्यिक योगदानाची दखल घेत युनायटेड अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या वतीने मानद ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ (D.Litt.) पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या गौरवामुळे सिंधुदुर्गच्या साहित्यिक क्षेत्रातून आनंद व्यक्त होत असून, साहित्यप्रेमी आणि कवींकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वृत्तबद्ध कवितेचा ध्यास घेत गेली अनेक वर्षे साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेले विजय जोशी हे ‘विजो’ या टोपणनावाने परिचित आहेत. त्यांनी आजवर वृत्तबद्ध कविता आणि गझल लेखनाच्या तंत्रावर आधारित ८० हून अधिक कार्यशाळा यशस्वीपणे घेतल्या आहेत. महाराष्ट्रासह देश-विदेशातील अनेक नवोदित कवींना या कार्यशाळांचा लाभ झाला असून, वृत्तबद्ध कविता लेखनाची गोडी अनेकांमध्ये निर्माण झाली आहे. मराठी काव्यविश्वात वृत्तबद्ध कवितेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी केलेले हे कार्य महत्त्वपूर्ण मानले जाते.
