स्वलिखित कविता पाठविण्यास ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत:निवडक २५ कवींना काव्यवाचनाची संधी..

⚡कुडाळ ता.०७-: लेखन आणि वाचन कौशल्याला प्रोत्साहन देण्याबरोबरच नवोदित कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने जिल्हास्तरीय काव्यलेखन व काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींनी आपली स्वलिखित एक कविता ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या नावे रावबहादूर अनंत शिवाजी देसाई वाचनालय (जिल्हा ग्रंथालय), कुडाळ बाजारपेठ येथील कार्यालयात पाठवावी. कवितेसोबत स्पर्धकांनी आपला संपूर्ण पत्ता आणि मोबाइल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. कविता टपालाने किंवा प्रत्यक्ष कार्यालयात स्वीकारली जाणार असून, व्हॉट्सॲपद्वारे पाठविलेल्या कविता स्वीकारल्या जाणार नाहीत.
स्पर्धेसाठी पाठविण्यात येणारी कविता जास्तीत जास्त २० ओळींची असावी. विडंबनात्मक, राजकीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करणारी तसेच टीका-टिप्पणी करणारी कविता स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. प्राप्त कवितांमधून परीक्षकांद्वारे केवळ २५ कवितांची निवड करण्यात येईल.
निवड झालेल्या २५ कवींना आपली कविता सादर करण्यासाठी स्वतंत्र काव्यवाचन स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेतील प्रथम पाच क्रमांकांच्या विजेत्यांना रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या आयोजनासंदर्भातील सर्व अधिकार आयोजक संस्थेकडे राखीव राहतील. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह राजन पांचाळ (मो. ९४२३०२६७३५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
