अरविंद मोंडकर ; सत्ताधाऱ्यांच्या हुकूमशाहीविरोधात ‘दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय’ धडक हक्क मोर्चा…

⚡मालवण ता.०७-:
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा आणि दूध उत्पादकांचा मुख्य आधार असलेला ‘गोकुळ’ सहकारी दूध उत्पादक संघ आज देशभरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. लाखो शेतकऱ्यांच्या अपार कष्टातून आणि श्रमांतून उभारलेल्या या गोकुळ दुग्ध संघावर सत्ताधाऱ्यांकडून राजकीय दबाव आणून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न सुरू आहे. याविरोधात कोल्हापुरात पुकारण्यात आलेल्या संघर्ष आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पूर्ण ताकदीने सहभागी होणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मोंडकर यांनी म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या गोकुळच्या संचालक मंडळ निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ला मतदारांनी स्पष्ट कौल दिला होता. नियम आणि परंपरेनुसार या आघाडीचाच अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, राज्यातील सत्ताधारी पक्षाने आपल्या राजकीय अधिकारांचा गैरवापर करत, जादा संचालक लादून मतदारांच्या कौलाचा अवमान केला आहे. आपल्या मर्जीतील अध्यक्ष बसवण्यासाठी सत्ताधारी करत असलेल्या या हुकूमशाही कारभारावर कोल्हापुरातील शेतकरी व दूध उत्पादक प्रचंड संतप्त आहेत.
शेतकऱ्यांच्या या हक्काच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता ‘दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर’ असा भव्य संघर्ष मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
या संघर्षात कोल्हापूरच्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्गातून सुमारे दीडशे कार्यकर्ते या आंदोलनात सक्रिय सहभागी होण्यासाठी कोल्हापूरकडे रवाना होणार असल्याचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी स्पष्ट केले आहे.
