Headlines

जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेचे ६ डिसेंबरला कुडाळ येथे आयोजन…

कुमुद रेगे यांच्या साहित्यकृतीवर सादरीकरणाची संधी:तालुकास्तरावरील विजेते घेणार जिल्हा स्पर्धेत सहभाग..

⚡कुडाळ ता.०७-: वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका ग्रंथालयांच्या सहकार्याने होणारी ही स्पर्धा रविवार, ६ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता रावबहादूर अनंत शिवाजी देसाई (टोपिवाले) वाचनालय व ग्रंथसंग्रहालय, कुडाळ येथे होणार आहे.
या स्पर्धेचा विषय साहित्यिका श्रीमती कुमुद गजानन रेगे यांची कोणतीही एक साहित्यकृती असा असून, प्रत्येक स्पर्धकाला सादरीकरणासाठी १० मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रथम तालुकास्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहे. संबंधित तालुक्यातील कोणत्याही ग्रंथालयाचा वाचक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. तालुकास्तरीय स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांच्या विजेत्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. सर्व तालुका ग्रंथालयांनी ६ डिसेंबरपूर्वी तालुकास्तरीय स्पर्धा घेऊन विजेत्या तीन स्पर्धकांची नावे जिल्हा ग्रंथालय संघाकडे पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेतील प्रथम पाच विजेत्यांना अनुक्रमे १,०००, ७००, ५००, ३०० आणि २०० रुपये रोख पारितोषिकांसह प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धकांच्या तयारीसाठी कुमुद रेगे यांच्या ‘आई’, ‘उर्वशी’, ‘कालचक्र’, ‘गंधार’, ‘घरकुल’, ‘नंदादीप’, ‘नकोशी’, ‘नियती’, ‘निसर्गकन्या प्राजक्त’, ‘भैरवी’, ‘मनस्विनी’, ‘मैत्री’, ‘वृंदा’, ‘वेगळ्या वाटेने जाताना’, ‘सखी’ आणि ‘सावत्रबाप’ या साहित्यकृती रावबहादूर अनंत शिवाजी देसाई वाचनालय (जिल्हा ग्रंथालय), कुडाळ येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
स्पर्धेच्या आयोजनाबाबत आवश्यक मार्गदर्शन संबंधित तालुक्यांचे जिल्हा ग्रंथालय संघ प्रतिनिधी करणार आहेत. अधिक माहितीसाठी कुडाळ येथे जयेंद्र तळेकर (७५८८९०१९८३), राजन पांचाळ (९४२३०२६७३५), कणकवली येथे धाकू तानवडे (९४२११४७८६८), सावंतवाडी व दोडामार्ग येथे भरत गावडे, विठ्ठल कदम व अॅड. संतोष सावंत, वेंगुर्ला येथे महेश बोवलेकर, गुरुनाथ मडवळ व नंदन वेंगुर्लेकर, तर मालवण येथे रुजारियो पिंटो, ऋतुजा केळकर व संजय शिंदे यांच्याशी संपर्क साधावा, असे सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह यांनी कळविले आहे.

You cannot copy content of this page