फ्लाय९१कडून सेवा सुरू करण्याची घोषणा:तिकीट बुकिंगला सुरुवात..

⚡कुडाळ ता.०७-: सिंधुदुर्गवासीयांची मुंबईशी थेट विमानसेवा सुरू होण्याची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपणार आहे. फ्लाय९१ या प्रादेशिक विमान कंपनीने चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावरून नवी मुंबईसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. येत्या १६ नोव्हेंबरपासून ही सेवा सुरू होणार असून, विमान प्रवासासाठी तिकीट बुकिंगही सुरू झाले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.
सिंधुदुर्ग ते मुंबई हे सुमारे ५०० किलोमीटरचे अंतर आतापर्यंत रस्ते किंवा रेल्वेने पार करावे लागत होते. त्यासाठी प्रवाशांचा बराच वेळ खर्च होत होता. आता थेट विमानसेवा सुरू झाल्याने व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी तसेच पर्यटनासाठी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सिंधुदुर्गमधून सध्या विमानसेवा देणारी फ्लाय९१ ही एकमेव विमान कंपनी आहे.
या नव्या विमानसेवेमुळे मुंबईकर पर्यटकांनाही सिंधुदुर्गच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांसह विविध पर्यटनस्थळांना भेट देणे अधिक सोयीचे होणार आहे. पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्याबरोबरच जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठीही या विमानसेवेचा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
फ्लाय९१चे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी या सेवेसंदर्भात सांगितले की, सिंधुदुर्गवासीयांची मुंबईशी थेट आणि सोयीस्कर विमान संपर्काची मागणी लक्षात घेऊन नवी मुंबई सेवा सुरू करण्यात येत आहे. सिंधुदुर्गमधून कार्यरत असलेली एकमेव विमान कंपनी म्हणून जिल्ह्याला विश्वासार्ह हवाई संपर्क उपलब्ध करून देण्याचे महत्त्व कंपनी जाणते. या सेवेमुळे पर्यटनवाढीसह आर्थिक संधीही निर्माण होतील.
नवी मुंबई विमानतळ हे मुंबई महानगर प्रदेशासाठी आधुनिक प्रवेशद्वार ठरणार असून, अटल सेतूमुळे दक्षिण मुंबई आणि वांद्रे-कुर्ला संकुलापर्यंत (बीकेसी) पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच बस, टॅक्सी आणि ॲपआधारित कॅब सेवांमुळे पुढील प्रवासासाठीही चांगली कनेक्टिव्हिटी उपलब्ध असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
सिंधुदुर्ग, जळगाव, सोलापूर आणि पुणे या शहरांनंतर नवी मुंबई हे महाराष्ट्रातील फ्लाय९१चे पाचवे, तर देशभरातील १४ वे गंतव्यस्थान ठरणार आहे. कंपनीकडून सध्या गोव्यातील मोपा, महाराष्ट्रातील विविध शहरे, बेंगळुरू, हुबळी, अगत्ती, कोची, हैदराबाद तसेच आंध्र प्रदेशातील राजमुंदरी, विजयवाडा आणि तिरुपती या ठिकाणी विमानसेवा दिली जाते.
या नव्या विमानसेवेचे तिकीट बुकिंग फ्लाय९१च्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच प्रमुख ऑनलाइन ट्रॅव्हल बुकिंग प्लॅटफॉर्मवर सुरू झाले आहे. त्यामुळे सिंधुदुर्गवासीयांना आता मुंबई गाठण्यासाठी थेट विमानप्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
