Headlines

पिंगुळी कला महोत्सवाचा दिमाखात प्रारंभ…

ठाकर लोककलेच्या विविध आविष्कारांनी रसिक मंत्रमुग्ध:पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या कार्याचे मान्यवरांकडून कौतुक..

कुडाळ : ठाकर समाजाच्या समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा अनोखा आविष्कार अनुभवण्याची संधी पिंगुळीकरांसह रसिकांना मिळाली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘पिंगुळी कला महोत्सवा’चे उद्घाटन शुक्रवारी (६ नोव्हेंबर) सायंकाळी ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालय व आर्ट गॅलरी येथे उत्साहात झाले.
या महोत्सवाच्या माध्यमातून ठाकर समाजाच्या पारंपरिक लोककलांचे दर्शन घडविण्यासोबतच त्यांचे जतन, संवर्धन आणि हा सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
उद्घाटन सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे, सेन्सॉर बोर्ड सदस्य तथा नाट्यकर्मी विजय चव्हाण, सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी संदीप बळवडे, सरपंच अजय आकेरकर, सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे अध्यक्ष शशांक आटक, उपसरपंच मंगेश मसके, तंटामुक्ती समिती अध्यक्ष भगवान रणसिंग, समन्वयक मंगेश खरात, चेतन गंगावणे, एकनाथ गंगावणे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी पद्मश्री परशुराम गंगावणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोककला जतन व संवर्धनासाठी केलेल्या कार्याचे विशेष कौतुक केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ओळख व प्रतिष्ठा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
नाट्यकर्मी विजय चव्हाण यांनी पिंगुळीची ठाकर लोककला हे सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक वैभवातील मानाचे स्थान असल्याचे नमूद केले. अशा महोत्सवांमुळे पारंपरिक कलांना व्यासपीठ मिळण्याबरोबरच नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दोडामार्ग-कोनाळकट्टा येथील राधानृत्य, महिलांची फुगडी, कळसूत्री बाहुल्या, पांगुळ बैल, पिंगुळी-मालवणी गोंधळ आणि चित्रकथी अशा विविध पारंपरिक लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. या वैविध्यपूर्ण कलाविष्कारांना उपस्थित रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, शनिवारी (७ नोव्हेंबर) सायंकाळी ७ वाजता कळसूत्री बाहुल्या आणि अन्य पारंपरिक लोककलांचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पिंगुळीच्या मातीत पिढ्यान्‌पिढ्या जपल्या गेलेल्या लोककलेला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देणारा हा महोत्सव सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणारा ठरत आहे.

You cannot copy content of this page