Headlines

दिव्यांग व दुर्बल घटकांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा…

राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे प्रदेशाध्यक्ष संजय देसाई यांची ॲड. समीर वंजारी यांच्या काँग्रेस संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट; कोकण फेडरेशनवर निवड झाल्याबद्दल वंजारी यांचा सत्कार..

⚡सावंतवाडी ता.०७-:
राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे प्रदेशाध्यक्ष संजय देसाई यांनी पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीसमवेत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. समीर वंजारी यांच्या सावंतवाडी येथील काँग्रेस संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी कोकण फेडरेशनवर निवड झाल्याबद्दल संजय देसाई यांच्या हस्ते ॲड. समीर वंजारी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष बाबाजी पास्ते, जिल्हा उपाध्यक्ष मनोज सातोसे आणि जिल्हा खजिनदार रोहन घाडी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान दिव्यांग, निराधार, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, एकल महिला, तृतीयपंथीय तसेच समाजातील विविध दुर्बल व वंचित घटकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या घटकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील वंचित घटकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत विचारविनिमय झाला.
यावेळी ॲड. समीर वंजारी यांनी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही दिव्यांग बांधवावर अन्याय झाल्यास त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आपण सदैव ठामपणे पाठीशी उभे राहू. त्यांना आवश्यक ती कायदेशीर मदत व सहकार्य करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही दिली.
समाजातील वंचित, दुर्बल आणि उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय दिव्यांग पार्टी करीत असलेले कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत ॲड. वंजारी यांनी पक्षाच्या आगामी वाटचालीस तसेच जिल्ह्यातील संघटनात्मक विस्तारास शुभेच्छा दिल्या.
सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि समाजातील दुर्लक्षित घटकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

You cannot copy content of this page