Headlines

पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजमध्ये नवागतांचे जल्लोषात स्वागत…

‘मिस फ्रेशर’चा मान दीक्षा आचरेकरला:मयूर परब ठरला ‘मिस्टर फ्रेशर’..

⚡कुडाळ ता.०७-: हुमरमळा येथील श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘फ्रेशर्स पार्टी’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सांस्कृतिक कार्यक्रम, विविध मनोरंजनात्मक स्पर्धा, फॅशन शो आणि खेळांच्या माध्यमातून नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात दीक्षा आचरेकर हिने ‘मिस फ्रेशर’, तर मयूर परब याने ‘मिस्टर फ्रेशर’ हा किताब पटकावला.
इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूपतसेन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला संस्था परिसर संचालिका नूतन परब, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. युवराज पांढरे, कृषी कॉलेजचे प्राचार्य पांडुरंग लंगुटे, नर्सिंग विद्यालयाचे प्राचार्य ओंकार गरड आदी मान्यवर उपस्थित होते.
देवी सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांसह द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्था परिसर संचालिका नूतन परब म्हणाल्या, “महाविद्यालयातील हा केवळ तुमचा पहिला दिवस नसून आयुष्याच्या नव्या पर्वाची सुंदर सुरुवात आहे. येथे विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतलेले तुम्ही भविष्यात भारताचे जबाबदार नागरिक म्हणून बाहेर पडाल.”
प्राचार्य डॉ. युवराज पांढरे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयीन जीवन हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसून व्यक्तिमत्त्व विकासाची संधी आहे. गुणवत्ता यादीत स्थान मिळविण्याबरोबरच एक चांगला माणूस बनणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एकल नृत्य, समूह नृत्य, गायन आणि फॅशन शो सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. नवागत विद्यार्थ्यांसाठी आयोजित विविध खेळ आणि प्रश्नमंजुषा स्पर्धांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धांमधून दीक्षा आचरेकर हिची ‘मिस फ्रेशर’, तर मयूर परब याची ‘मिस्टर फ्रेशर’ म्हणून निवड करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
याच कार्यक्रमात महाविद्यालयाच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. या अंकात विद्यार्थ्यांच्या कविता, लेख, कथा, निबंध आणि चित्रकलेचा समावेश असून त्यांच्या साहित्यिक व कलात्मक गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा पणदूरकर, धनश्री कुपेरकर आणि सिद्धी गवस यांनी केले. विद्यार्थी प्रतिनिधी ज्ञानदा मेस्त्री हिने आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.

You cannot copy content of this page