‘स्मार्ट वहिनी’ ठरल्या सानिका जोशी:तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद..

⚡कुडाळ ता.०७-: ग्रामविकासाला सामाजिक बांधिलकीची जोड देत ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय महोत्सवाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आयोजित या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आबालवृद्धांसाठी आनंदाची पर्वणीच उपलब्ध झाली. महोत्सवातील महिलांसाठीच्या ‘स्मार्ट वहिनी’ स्पर्धेत सानिका संदीप जोशी यांनी विजेतेपद पटकावले, तर अक्षरा अमित डिचोलकर यांनी उपविजेतेपद मिळविले. विविध उपक्रमांनी रंगलेल्या या महोत्सवाची उत्साहात सांगता झाली.
तेर्सेबांबर्डे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ च्या पटांगणावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधींची दूरदृष्टी, ग्रामपंचायत प्रशासनाची कार्यतत्परता आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असतो. या सर्व घटकांना एकत्र आणण्याचे काम महोत्सवाच्या माध्यमातून झाले. ग्रामविकासासोबतच सामाजिक एकोपा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम यावेळी राबविण्यात आले.
सानिका जोशी ‘स्मार्ट वहिनी’च्या विजेत्या
महोत्सवातील ‘स्मार्ट वहिनी’ हा महिलांसाठीचा विशेष कार्यक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या स्पर्धेत तब्बल ४२ महिलांनी सहभाग घेतला. नागेश नेमळेकर यांनी खुमासदार निवेदनशैलीत विविध मनोरंजक खेळ आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून कार्यक्रमात रंगत आणली. या स्पर्धेत सानिका संदीप जोशी यांनी प्रथम क्रमांक मिळविला, तर अक्षरा अमित डिचोलकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते विजेत्या सानिका जोशी यांना फ्रीज व सन्मानचिन्ह, तर उपविजेत्या अक्षरा डिचोलकर यांना वॉशिंग मशीन व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
जनावरांच्या सजावट स्पर्धेला प्रतिसाद
महोत्सवात गाय, म्हैस, बैल आणि रेडा सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. जनावरांची आकर्षक सजावट उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. याशिवाय शालेय विद्यार्थी, महिला आणि पुरुषांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विविध स्पर्धांमधील विजेत्यांनाही मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध स्तरांवर योगदान देणाऱ्या व्यक्ती व घटकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यात आले. गावाच्या विकासात आणि सामाजिक परिवर्तनात योगदान देणाऱ्यांचीही यावेळी दखल घेण्यात आली.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
ग्रामविकासाचा आदर्श निर्माण करणारा उपक्रम : प्रमोद कामत
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत म्हणाले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ‘जलसमृद्ध गाव’ ही संकल्पना राबविताना ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डेने सामाजिक जाणिवेची जोड देत लोकहिताला प्राधान्य देणारे विविध उपक्रम आयोजित केले आहेत. गावातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे, त्यांच्या गरजांना आधार देणे, कलागुणांना वाव देणे आणि सामाजिक एकोपा वृद्धिंगत करणे, हीच खरी ग्रामविकासाची संकल्पना आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून तेर्सेबांबर्डेने सामाजिक बांधिलकी जपणारा आगळावेगळा उपक्रम साकारल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी कुडाळचे उपसभापती सीताराम तेली, जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर, रुपेश कानडे, बावचे माजी सरपंच नागेश आईर, अणावचे माजी सरपंच विनायक अणावकर, सरपंच रामचंद्र परब, उपसरपंच माधवी कानडे, ग्रामपंचायत सदस्य अजय डिचोलकर, संतोष साटेलकर, गुणाजी जाधव, महेंद्र मेस्त्री, प्रणाली साटेलकर, रोहिणी हळदणकर, धनश्री गवस, गंधाली परब, पोलीस पाटील रमाकांत जाधव, मानकरी रमेश परब, तंटामुक्त समिती अध्यक्ष सत्यव्रत पाटकर, माजी सरपंच सुभाष परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अंकिता जोशी, मुख्याध्यापक अनंत राणे, ग्रामविकास अधिकारी भूषण बालम आदी उपस्थित होते.
महोत्सवादरम्यान शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, नगरसेविका संध्या तेर्से, कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, मिलिंद नाईक, सरपंच संघटना अध्यक्ष राजन परब यांच्यासह विविध गावांचे सरपंच आणि मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
‘निधी उभारूया चाऱ्यासाठी’ उपक्रमाला प्रतिसाद
शेती आणि पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. बदलते हवामान, पावसाची अनिश्चितता आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पशुधनासाठी चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी व्हावा आणि त्यांच्या पशुधनाला चारा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने ‘निधी उभारूया चाऱ्यासाठी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला ग्रामस्थांसह अन्य दात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत चांगल्या प्रमाणात निधी संकलित केला. या माध्यमातून ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.