वेंगुर्ला पोलीस स्थानकामार्फत शहरात वाहतुकीचे चोख नियोजन

वेंगुर्ला
दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला असुन वेंगुर्ला शहरातील मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी शनिवारी सायंकाळी रात्री उशिरा ग्राहकांची गर्दी झाली होती. घरोघरी दिवाळी सणाची लगबग सुरु झाली असुन शहरात घरगुती पोहे, विविध आकर्षक पद्धतीच्या पणत्या, आकाशकंदील व इतर घरगुती साहित्य खरेदीसाठी संपूर्ण बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. तसेच काही प्रमाणात कापड दुकानातही गर्दी होती. दिवाळी सणाला
शहरात ग्रामीण भागात उल्हासमय वातावरण निर्माण झाले असुन तालुक्यात नरकासुर दहन करून अभ्यंगस्नानाने दिवाळीचा आनंद द्विगुणित होणार आहे. वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत वेंगुर्ला भटवाडी कार्यक्षेत्र तसेच अन्य भागात इलेक्ट्रिक स्ट्रिप्स बसविण्यात आल्याने चैतन्यमय वातावरण निर्माण झाले असुन शहरात पर्यटक संख्याही वाढत आहे. नगरपरिषद मार्फत तसेच वेंगुर्ला पोलीस स्थानकामार्फत शहरात दिवाळी सणाच्या अनुषंगाने वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने हॉस्पिटल नाका, गाडी अड्डा नाका, मारुती मंदिर स्टॉप, सारस्वत बँक, दाभोली नाका, पिराचा दर्गा, रामेश्वर मंदिर स्टॉप आदी भागात वाहतूक पोलीस, महिला पोलीस, होमगार्ड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान गतवर्षी शेतीचे प्रमाण अल्प झाले असुन शहरातील पोहे गिरणीवर तुरळक गर्दी दिसून येत होती. त्यामुळे पोहे गिरणी व्यावसायिक यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यात 2 दिवस अवकाळी पाऊस झाल्यानंतर ग्रामीण भागात शेतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
