Headlines

युवा पिढीने सामाजिक व सार्वजनिक कार्यात सक्रिय व्हावे…

प्राजक्ता बांदेकर शिरवलकर:संत राऊळ महाराज महाविद्यालयात विकसित भारत युवा संसद २०२६ उत्साहात..

⚡कुडाळ ता.०७-: आजची युवा पिढी ही उद्याच्या भारताचे नेतृत्व करणारी ताकद असून, तरुणांनी शिक्षणासोबतच सामाजिक आणि सार्वजनिक कार्यातही सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांनी केले.
केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने ‘विकसित भारत @ २०४७’ या संकल्पनेच्या अनुषंगाने ‘विकसित भारत युवा संसद २०२६’चे आयोजन ‘माय भारत, सिंधुदुर्ग’ यांच्या पुढाकाराने संत राऊळ महाराज महाविद्यालयात करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, जिल्हा युवा अधिकारी सम्राट पाटील, कार्यक्रम अधिकारी अपेक्षा मांजरेकर, एनएसएस कार्यक्रम अधिकारी सबा शहा, फिजा मकानदार, परीक्षक प्रा. हरीभाऊ भिसे, प्रा. वैभव खानोलकर, शंकर तेजम, रणजीत रणसिंग यांच्यासह जिल्ह्यातील स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते.
प्राजक्ता बांदेकर शिरवलकर म्हणाल्या की, युवा संसदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्याची आणि नेतृत्वगुण विकसित करण्याची संधी मिळत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. युवकांना लोकशाही प्रक्रियेशी जोडणे, संसदीय कार्यपद्धतीची जाणीव करून देणे आणि राष्ट्राच्या विकासात त्यांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यंदाच्या युवा संसदेचा चर्चेचा प्रमुख विषय ‘एक देश, एक निवडणूक’ असून, या विषयावर युवकांना संसदीय व्यासपीठावर आपली मते आणि दृष्टिकोन मांडता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. वैभव खानोलकर यांनी राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. या उपक्रमामुळे युवकांमध्ये नेतृत्वगुण, वक्तृत्वकला, निर्णयक्षमता, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक जबाबदारीची भावना विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांना केवळ विकासाचे लाभार्थी न ठेवता देशाच्या भविष्याचे शिल्पकार बनविणे, तसेच सक्षम, जागरूक आणि जबाबदार युवा नेतृत्व घडविणे हा या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविकात जिल्हा युवा अधिकारी सम्राट पाटील यांनी युवा संसदेची उद्दिष्टे स्पष्ट केली. युवकांमध्ये सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय प्रश्नांविषयी जागरूकता निर्माण करणे, नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर विचार मांडण्याची क्षमता विकसित करणे, नेतृत्वगुण आणि संवादकौशल्य वाढविणे, तसेच मतभिन्नतेचा आदर करण्याची लोकशाही वृत्ती रुजविणे ही या उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांनी मांडलेल्या कल्पना व सूचनांचा उपयोग धोरणकर्ते आणि प्रशासकीय यंत्रणेला व्हावा, हा विकसित भारत युवा संसदेचा महत्त्वपूर्ण हेतू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भावेश चव्हाण यांनी केले.

You cannot copy content of this page