Headlines

भुयारी गटार योजनेचे अपयश सांगताना स्वतःच्याच माजी आमदारांचे अपयश अधोरेखित करू नका…

महेश कांदळगांवकर यांचा नगरसेवक महेंद्र म्हाडगुत आणि मंदार ओरोसकर यांना टोला..

⚡मालवण ता.०७-:
मालवण नगरपरिषदेच्या भुयारी गटार योजनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, माजी नगराध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगांवकर यांनी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत आणि मंदार ओरोसकर यांच्या भूमिकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. माजी नगराध्यक्षांच्या कार्यकाळातील अपयश दाखवताना त्याच कालावधीतील आपल्या पक्षाच्या माजी आमदारांचे अपयशही अधोरेखित होत असल्याचे लक्षात घ्या. आमच्या काळातील प्रलंबित कामांबाबत प्रश्न विचारताना २०१४ ते २०२४ अशी दहा वर्षे आमदार असलेल्या वैभव नाईक यांना भुयारी गटार योजना पूर्ण का करता आली नाही, असा सवाल कांदळगांवकर यांनी उपस्थित केला आहे.

मालवण नगरपरिषदेची भुयारी गटार योजना २०१२ पासून प्रत्यक्षात सुरू झाली. मात्र, विविध अडचणींमुळे आजतागायत ती पूर्णत्वास जाऊ शकलेली नाही. २०१६ ते २०२१ या आपल्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात प्रयत्न करूनही ही योजना पूर्ण करता आली नाही, ही वस्तुस्थिती आम्ही त्यावेळीच वृत्तपत्रे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीरपणे मान्य केली होती. चांगल्या कामाचे श्रेय घ्यायचे असेल तर प्रलंबित कामांची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे, अशी भूमिका कांदळगांवकर यांनी मांडली.
आपल्या कार्यकाळात भुयारी गटार योजनेला गती देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तत्कालीन आमदार वैभव नाईक आणि आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून सुमारे साडेनऊ कोटी रुपयांचा निधी २०१८ मध्ये उपलब्ध झाला होता. याबद्दल मालवणवासीयांच्या वतीने जाहीर आभारही मानण्यात आले होते. या निधीनंतर योजनेच्या कामाला काही प्रमाणात गती मिळाली. मालवण बाजारपेठ ते रेवतळे या भुयारी गटाराच्या पाइपलाइनची यशस्वी चाचणीही तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत घेण्यात आली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, २०१९ आणि २०२० मध्ये आलेल्या कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन, निधीची कमतरता आणि अन्य अडचणींमुळे अनेक विकासकामे मुदतीत पूर्ण होऊ शकली नाहीत. निसर्ग चक्रीवादळासह विविध आपत्तींमुळे आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात प्रत्यक्ष कामासाठी जेमतेम तीन वर्षे मिळाल्याचेही कांदळगांवकर यांनी नमूद केले.

डिसेंबर २०२१ मध्ये नगरपरिषदेची मुदत संपल्यानंतर प्रशासकीय राजवट सुरू झाली. या काळात सुरू असलेली अनेक विकासकामे पूर्ण झाली नाहीत. प्रशासकीय कारभारातील त्रुटींविरोधात दोन ते तीन वर्षे वृत्तपत्रे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवूनही भुयारी गटार योजनेसह अनेक कामांना पूर्णत्व मिळाले नाही. मग २०२१ ते २०२४ या कालावधीत प्रशासकीय यंत्रणेकडून ही कामे पूर्ण करून घेण्यासाठी आपण काय प्रयत्न केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दहा वर्षे आमदार असताना योजना पूर्ण का झाली नाही?
भुयारी गटार योजनेला तब्बल १२ ते १३ वर्षांचा कालावधी झाला आहे. यातील २०१४ ते २०२४ अशी सलग दहा वर्षे वैभव नाईक हे आमदार होते. मग या दहा वर्षांच्या कालावधीत ही योजना पूर्ण का होऊ शकली नाही, हा प्रश्न त्यांनाही विचारला गेला पाहिजे. केवळ आमच्या कार्यकाळातील प्रलंबित कामांबाबत आम्हालाच जबाबदार धरण्याचा नियम असेल, तर तोच नियम आपल्या पक्षाच्या तत्कालीन आमदारांनाही लागू होतो, असे कांदळगांवकर यांनी म्हटले आहे.

नगरसेवक म्हाडगुत आणि मंदार ओरोसकर यांनी एक बोट आमच्याकडे दाखवताना चार बोटे आपल्याकडेही आहेत, याचे भान ठेवावे. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी मालवणच्या जनतेची दिशाभूल करणारी वक्तव्ये करू नयेत. आमच्या कार्यकाळातील अपयशाचा लेखाजोखा मांडताना आपणच आपल्या पक्षाच्या माजी आमदारांचे अपयश अधोरेखित करत आहात, याची नोंद घ्यावी, असा टोला त्यांनी लगावला.

You cannot copy content of this page