⚡सावंतवाडी ता.०८-: राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना अडवून मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील चारही आरोपींची ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. संशयाचा फायदा देत न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.आरोपींच्या वतीने अॅड. परशुराम चव्हाण आणि अॅड. शुभेश वंजिबाळे यांनी काम पाहिले.

या प्रकरणाची घटना २० डिसेंबर २०२० रोजी घडली होती. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे कर्मचारी सावंतवाडी ते बांदा दरम्यान गस्त घालत असताना इन्सुली खामदेव नाका येथे थांबले होते. त्याचवेळी दुसरे पथक बांदा येथे गस्त घालत असताना MH 07-AG-0216 क्रमांकाची स्विफ्ट कार आणि MH 07-AG-9006 क्रमांकाची बोलेनो कार यामधून दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली.
त्यानुसार भरारी पथकाने या दोन्ही वाहनांचा पाठलाग सुरू केला. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही वाहने खामदेव नाका येथे आली असता, दुय्यम निरीक्षक जारंडे यांनी वाहनचालकांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, संबंधित वाहनचालकांनी वाहने न थांबवता पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी दोन्ही वाहनांचा पाठलाग केला.
दरम्यान, MH 07-AG-0216 क्रमांकाच्या स्विफ्ट कारने राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाच्या MH-10-N-0757 क्रमांकाच्या सुमो गाडीला समोरून धडक दिली. त्यानंतर पाठोपाठ आलेल्या बोलेनो कारमधील चालकाने भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यांचा हात पकडल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी सुमो चालकाने वाहन आडवे घेतले असता बोलेनो गाडी थांबली. त्यानंतर भरारी पथकाचे प्रमुख पांडुरंग रंगराव पाटील यांनी बोलेनो गाडीच्या चालकाच्या बाजूला जाऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना धक्काबुक्की करून वाहनचालकाने गाडी सावंतवाडीच्या दिशेने पळवून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
या प्रकरणी तुषार विनायक तुळसकर, विठ्ठल संतोष चोगुले, सालिम निसार नदाफ आणि अजय सूर्यकांत कवठणकर यांच्याविरोधात भादंवि कलम ३५३, १८६, ३४ अन्वये बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्याची सुनावणी ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. खटल्यादरम्यान एकूण पाच साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. आरोपींच्या वतीने अॅड. परशुराम बाबुराव चव्हाण यांनी घेतलेला उलटतपास, अंतिम युक्तिवाद तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांचा दाखला न्यायालयाने ग्राह्य धरला. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी संशयित चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
आरोपींच्या वतीने अॅड. परशुराम बाबुराव चव्हाण आणि अॅड. शुभेश सुरेश वंजिबाळे यांनी काम पाहिले.
