Headlines

बांदा स्मशानभूमी परिसर झाला चकाचक…

शहर विकास आघाडीच्या मागणीला यश;

⚡बांदा ता.१६-: बांदा येथील सार्वजनिक स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आल्याने निर्माण झालेल्या अस्वच्छतेच्या प्रश्नावर अखेर प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली आहे. बांदा शहर विकास आघाडीने सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन स्मशानभूमी परिसर स्वच्छ करण्याची करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत स्मशानभूमी परिसरासह लगतचा रस्ता आणि ओहोळ यांची संपूर्ण साफसफाई करण्यात आली.
स्मशानभूमी परिसरात साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तसेच परिसरात रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर बांदा शहर विकास आघाडीने निवेदनाद्वारे तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने कारवाईची मागणी केली होती.
मागणीनंतर ग्रामपंचायत प्रशासनाने तत्परता दाखवत स्मशानभूमी परिसरातील कचरा हटविण्याचे काम हाती घेतले. यामध्ये स्मशानभूमी परिसर, तेथील संपर्क रस्ता तसेच लगतचा ओहोळ यांची यंत्रणेमार्फत संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे परिसर पुन्हा स्वच्छ व सुस्थितीत आला असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. सरपंच प्रियांका नाईक, माजी उपसरपंच बाळु सावंत, उपसरपंच रत्नाकर आगलावे, आबा धारगळकर यांनी तातडीने याबाबत कार्यवाही केली. शहर विकास आघाडीचे सुशांत पांगम यांनीदेखील सहकार्याची भूमिका यावेळी घेतली.
यावेळी शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले. भविष्यात अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी कचरा साचणार नाही यासाठी नियमित स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. सरपंच प्रियांका नाईक यांनीही गावातील स्वच्छतेच्या प्रश्नांबाबत ग्रामपंचायत संवेदनशील असून आवश्यक ती कार्यवाही सातत्याने केली जाईल, अशी ग्वाही दिली.
फोटो:-
बांदा स्मशानभूमी परिसर तसेच रस्ता व ओहोळ परिसर चकाचक करण्यात आला.

You cannot copy content of this page