वेंगुर्ला, ता. ६ : विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त, सांघिकता, सांस्कृतिक मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ व्हावी या उद्देशाने वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि विशाल परब मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला तालुकास्तरीय शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १४ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता वेंगुर्ला हायस्कूल येथे होणार आहे.
स्पर्धेत वेंगुर्ला तालुक्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पाचवी ते सातवीच्या प्राथमिक गटातील तसेच इयत्ता आठवी ते दहावीच्या माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम नावनोंदणी करणाऱ्या दहा संघांनाच प्रवेश दिला जाणार असून, प्रत्येक संघात किमान सहा व कमाल पंधरा विद्यार्थ्यांचा समावेश असणे आवश्यक आहे.
माध्यमिक गटासाठी प्रथम ₹३,५००, द्वितीय ₹३,०००, तृतीय ₹२,५००, तर चतुर्थ व पाचव्या क्रमांकासाठी प्रत्येकी ₹१,००० अशी रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. प्राथमिक गटासाठी प्रथम ₹२,५००, द्वितीय ₹२,०००, तृतीय ₹१,५०० तसेच चतुर्थ व पाचव्या क्रमांकासाठी प्रत्येकी ₹१,००० अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. विजेत्या संघांना आकर्षक चषक व प्रमाणपत्र, तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेत मराठी, हिंदी किंवा संस्कृत भाषेतील राष्ट्रभक्तीपर, प्रेरणादायी व संस्कारक्षम समूहगीत सादर करणे आवश्यक असून चित्रपट गीतांना प्राधान्य दिले जाणार नाही. प्रत्येक संघासाठी सादरीकरणाची कमाल वेळ सात मिनिटे असेल. हार्मोनियम, तबला, ढोलकी, टाळ आदी मर्यादित वाद्यांना परवानगी असून रेकॉर्डेड ट्रॅक, ऑर्केस्ट्रा किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक संगीताचा वापर करण्यास सक्त मनाई राहील.
सूर, ताल, शब्दांची स्पष्टता, अभिव्यक्ती, समन्वय, शिस्त आणि एकूण सादरीकरण या निकषांवर स्पर्धेचे परीक्षण करण्यात येणार असून परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
स्पर्धेसाठी ११ ऑगस्टपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी डॉ. सचिन परुळकर (मो. ९४२१२३८०५३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस व विशाल परब मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
