Headlines

गॅस सिलिंडर बुकिंगवरील ४५ दिवसांची अट रद्द करण्याची मागणी…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..

⚡बांदा ता.०६-: घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगसाठी लागू असलेली ४५ दिवसांची कालमर्यादा तातडीने कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
भाजपचे युवा मोर्चाचे सरचिटणीस जावेद खतीब यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले. श्रावण महिना आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलिंडरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ४५ दिवसांच्या बुकिंग अटीमुळे सर्वसामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विशेषतः एकाच सिलिंडरवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना वेळेवर गॅस मिळत नसल्याने स्वयंपाकाची मोठी गैरसोय होत आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात गॅस वितरण केंद्रांपर्यंत वारंवार जावे लागत असून वाहतूक खर्च आणि प्रतीक्षेमुळे नागरिकांना अतिरिक्त आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
तसेच ४५ दिवसांच्या मर्यादेमुळे गॅस सिलिंडरचा काळाबाजार, अतिरिक्त दर आकारणी, कृत्रिम टंचाई आणि अनियमित वितरणाच्या तक्रारी वाढत असल्याने यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात पर्यायी इंधन सहज उपलब्ध नसल्यामुळे एलपीजी गॅस हा दैनंदिन जीवनासाठी अत्यावश्यक घटक ठरल्याचेही शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.
निवेदनात घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगची कालमर्यादा पूर्वीप्रमाणे १५ ते २१ दिवसांपर्यंत आणावी, श्रावण व गणेशोत्सव काळात विशेष सवलत द्यावी, जिल्ह्यातील सर्व गॅस वितरकांकडे पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा, काळाबाजार व अतिरिक्त दर आकारणीवर कठोर कारवाई करावी आणि ग्रामीण भागातील वितरण व्यवस्था अधिक प्रभावी करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी बांद्याचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळू सावंत, युवा मोर्चाचे मंडलाध्यक्ष सिद्धेश कांबळी, योगेश देसाई आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page