⚡बांदा ता.०६-: सावंतवाडी तालुक्यातील मळगाव परिसरात गवे-रेड्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेता तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली. याबाबत मनसेचे तालुका प्रमुख मिलिंद सावंत यांनी उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, मळगाव गावातील भरवस्ती तसेच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेल्या काही दिवसांपासून गवे-रेडे मोठ्या प्रमाणात वावरत असून भात पिकांसह इतर शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे. वन्य प्राणी भरवस्तीत येत असल्याने नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वनविभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ योग्य उपाययोजना कराव्यात, गवे-रेड्यांचा बंदोबस्त करून शेतकरी व नागरिकांना दिलासा द्यावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासन नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मळगाव परिसरात वन्य प्राण्यांमुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, याबाबत मनसेने वनविभागाचे लक्ष वेधल्याने संबंधित विभागाकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान; मनसेने उपवनसंरक्षकांचे लक्ष वेधले..
