Headlines

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सौरऊर्जा पॅनेलची भेट

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून उपक्रम…

दिविजा वृद्धाश्रमाला वॉशिंग मशीनचेही वाटप..

⚡कणकवली ता.२०-: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग भाजपच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्यात आले. पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या पुढाकारातून वेताळ बांबर्डे-कदमवाडी, कुडाळ येथील कातकरी आदिवासी समाजाच्या नाग्या महादू निवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांसाठी सौरऊर्जा पॅनेल देण्यात आले. तसेच असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमाला आवश्यक असलेले वॉशिंग मशीनही प्रदान करण्यात आले. कणकवली येथील खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयासमोर झालेल्या कार्यक्रमात ना. नितेश राणे यांच्या हस्ते या साहित्याचे वितरण करण्यात आले.

कातकरी व आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच वसतिगृहाचा वीज खर्च कमी होऊन उपलब्ध निधी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी वापरता यावा, या उद्देशाने सौरऊर्जा पॅनेल देण्यात आले. नाग्या महादू निवासी वसतिगृहाचे दरमहा सुमारे १४ ते १५ हजार रुपयांचे वीज बिल येत असल्याने सौरऊर्जा प्रकल्पामुळे हा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. वीज बिलावरील बचत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह इतर आवश्यक सुविधांसाठी वापरणे शक्य होणार आहे.

यावेळी बोलताना ना. नितेश राणे म्हणाले की, रवींद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षातील सामान्य कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष असा प्रवास केला आहे. त्यांचा हा प्रवास असंख्य भाजप कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. राजकारणात कार्यरत असतानाही समाजातील विविध घटकांना मदत करणे, त्यांना आधार देणे आणि सातत्याने लोकसेवा करणे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा गुण आहे.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग भाजपच्या वतीने आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे ना. राणे यांनी सांगितले. कातकरी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या संस्थेला सौरऊर्जा पॅनेल देण्यात आले असून, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना दीर्घकाळ मिळणार आहे. शिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी संस्थेच्या कार्याला यामुळे आणखी बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याच कार्यक्रमात असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमाला आवश्यक असलेल्या वॉशिंग मशीनचेही वाटप करण्यात आले. वृद्धाश्रमातील दैनंदिन कामकाज अधिक सुलभ होण्यास या सुविधेची मदत होणार आहे. सामाजिक गरजा लक्षात घेऊन अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

भारतीय जनता पक्षाच्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. निवडणुका असोत किंवा नसोत, भाजपचा कार्यकर्ता समाजातील विविध घटकांच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत असतो, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावताना त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि सामाजिक संस्थांना मदतीचा हात देणे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे ना. राणे यांनी सांगितले.

या उपक्रमाबद्दल नाग्या महादू निवासी वसतिगृहाच्या वतीने तसेच दिविजा वृद्धाश्रमाच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानण्यात आले.

यावेळी माजी आमदार अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, सभापती हर्षदा वाळके, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, सरपंच संदीप मेस्त्री, सरपंच बंडू ठाकूर, नगरसेवक गणेश उर्फ बंडू हर्णे, सहदेव उर्फ अण्णा खाडये, पप्पू पुजारे, औदुंबर राणे, नगरसेविका आर्या राणे, मनस्वी ठाणेकर, महेश सावंत, मेघा गांगण, किशोर राणे, सुधीर किंजवडेकर, असलदे सरपंच चंद्रकांत डांबरे, पप्पू पुजारे, सागर राणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page