Headlines

पाणीटंचाईच्या उपाययोजनांवरून नगरपंचायत प्रशासनाला नगरसेवकांचा जाब…

४५ दिवस उलटूनही बंधारे बांधण्याबाबत कार्यवाही नाही:पर्यटन महोत्सवाच्या १० लाखांच्या खर्चाला विरोध..

⚡कणकवली ता.२७-: एल निनोच्या प्रभावामुळे यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे प्रमाण घटले असून, जिल्ह्यात दुष्काळाचा ट्रिगर १ लागू झाला आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली शहराला पाणीटंचाईची झळ बसू नये, यासाठी मागील सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, ४५ दिवसांचा कालावधी उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या दिरंगाईबद्दल नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त करत मुख्याधिकारी गौरी पाटील यांना जाब विचारला.

कणकवली नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा गुरुवार, २७ नोव्हेंबर रोजी नगरपंचायतीच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या प. पू. भालचंद्र सभागृहात नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, मुख्याधिकारी गौरी पाटील, नगरसेवक रुपेश नार्वेकर, जयेश धुमाळे, संकेत नाईक, लुकेश कांबळे, सत्यजित उर्फ बाळू पारकर, नगरसेविका सुमेधा अंधारी, दीपिका जाधव, जाई मुरकर, सुप्रिया नलावडे, बंडू हर्णे, संजय कामतेकर, राकेश राणे, प्रतीक्षा सावंत, मेघा सावंत, मेघा गांगण, मनस्वी ठाणेकर, आर्या राणे यांच्यासह नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी अमोल अघम, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून आयोजित करण्यात आलेल्या कणकवली पर्यटन महोत्सवासाठी नगरपंचायतीचा १० लाख रुपयांचा निधी खर्च केला जात असल्याने विरोधी गटाच्या नगरसेवकांनी या खर्चाला कडाडून विरोध केला. २१ कामांच्या निविदा रद्द करण्याच्या मुद्द्यावरून नगराध्यक्ष संदेश पारकर आणि स्वीकृत नगरसेवक बंडू हर्णे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. शहराच्या विकासकामांसाठी आलेला निधी परत जाणार असेल तर आपण दाखल केलेले अपील मागे घेण्यास तयार असल्याची भूमिका नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी मांडली. भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताचे काम असमाधानकारक असल्याने संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचा ठरावही सभेत घेण्यात आला.

मागील सभेचे इतिवृत्त अपलोड न केल्याने अमोल अघम यांना जाब

मागील सभेचे इतिवृत्त नगरपंचायतीच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले नसल्याचा मुद्दा नगरसेवक बंडू हर्णे यांनी उपस्थित केला. यावरून त्यांनी प्रशासकीय अधिकारी अमोल अघम यांना जाब विचारला. अघम हे कामात दिरंगाई करत असल्याने नागरिक त्यांच्या डोक्यावर बाटली मारतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. यावर आजच्या सभेचे इतिवृत्त येत्या सात दिवसांत नगरपंचायतीच्या संकेतस्थळावर अपलोड केले जाईल, असे मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच अमोल अघम यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा, अशा शब्दांत त्यांनी अघम यांची कानउघडणी केली.

४५ दिवस उलटूनही जलसंधारणाच्या उपाययोजना नाहीत; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप

शहराला पाणीटंचाईची झळ बसू नये, यासाठी प्रशासनाने बंधारे बांधण्यासह आवश्यक जलसंधारणाच्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचना मागील सभेत नगरसेवकांनी केली होती. मात्र, प्रशासनाने या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने नगराध्यक्षांना सामाजिक संस्थांनी बांधलेल्या बंधाऱ्यांची पाहणी करण्याची वेळ आली. या कामाची पाहणी करताना नगराध्यक्ष स्वतःच्या रिल्स बनवून आपण जलसंवर्धनासाठी काम करीत असल्याचे जनतेला भासवत आहेत, असा टोला बंडू हर्णे यांनी लगावला. तसेच नगराध्यक्षांनी वर्षभरात शहरासाठी २०० कोटी रुपये आणण्याची घोषणा केली होती, त्याचे काय झाले, असा सवालही हर्णे यांनी उपस्थित केला.

पर्यटन महोत्सवाच्या १० लाखांच्या खर्चाला विरोधी नगरसेवकांचा विरोध

जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती असताना कणकवली पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी नगरपंचायतीचा १० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येत असल्याने विरोधी गटाच्या नगरसेवकांनी या खर्चाला कडाडून विरोध केला. एकीकडे शहरातील संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी आवश्यक उपाययोजना झालेल्या नसताना दुसरीकडे महोत्सवावर निधी खर्च केला जात असल्याबद्दल नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.

२१ निविदांच्या अपिलावरून पारकर-हर्णे यांच्यात जोरदार खडाजंगी

२१ कामांच्या निविदा रद्द करण्याचा मुद्दा बंडू हर्णे यांनी सभेत उपस्थित केला. यावर नगराध्यक्ष संदेश पारकर आणि हर्णे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. २१ निविदा रद्द करण्याबाबत दाखल केलेले अपील आयुक्तस्तरावर प्रलंबित असून, त्याचा निकाल लागण्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कणकवली शहरासाठी आलेला विकासनिधी परत जाण्याची शक्यता असल्याचे सांगत, शहराच्या विकासकामांसाठी आलेला निधी मागे जाणार असेल तर आपण दाखल केलेले अपील मागे घेण्यास तयार असल्याची भूमिका नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी मांडली.

कणकवली शहरात व्यापारी संकुल, क्रीडा संकुल, नाट्यगृह, गार्डन आणि जलतरण तलाव यांसारखी शाश्वत विकासकामे उभारण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून, त्यासाठी सर्व राजकीय पक्षांची मदत घेत असल्याचे स्पष्टीकरण नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिले.

जुन्या भाजी मार्केटच्या १५ गुंठे जागेत व्यापारी संकुल उभारण्याचे नियोजन

शहरातील जुन्या भाजी मार्केटमध्ये नगरपंचायतीची १५ गुंठे जागा असून, ती जागा बंदिस्त करण्यात यावी, अशी सूचना नगराध्यक्षांनी केली. या जागेतील स्टॉलधारकांना हटविण्यासाठी नोटिसा पाठवाव्यात, तेथील जीर्ण इमारतीचे निर्लेखन करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी आणि जागेचे सपाटीकरण करून घ्यावे. या १५ गुंठे जागेत व्यापारी संकुल उभारण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रशासकीय कार्यवाही करावी, अशा सूचना नगराध्यक्ष श्री. पारकर यांनी दिल्या.

एसटी स्थानक परिसरातील आरक्षित जागा विकसित करण्यासाठी प्रयत्न

एसटी स्थानक परिसरातील नगरपंचायतीच्या आरक्षित जागा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या जागांपर्यंत जाण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने तातडीने हालचाली कराव्यात, अशी सूचना नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी मुख्याधिकारी गौरी पाटील यांना केली.

कलमठ ग्रामपंचायतीकडील पाणीवापराचे बिल थकीत; पाणीपुरवठा बंद न करण्याच्या सूचना

कणकवली नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेतून कलमठ गावाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, कलमठ ग्रामपंचायतीकडून पाणी वापराचे बिल अद्याप भरलेले नसल्याची बाब सोनाली खैरे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. यावर कलमठचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांना थकीत पाणीबिल भरण्याबाबत लेखी नोटीस पाठवावी. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी त्यांना नगरपंचायत कार्यालयात बोलावून मुख्याधिकाऱ्यांनी तोडगा काढावा. मात्र, कलमठला केला जाणारा पाणीपुरवठा बंद करू नये, अशी भूमिका नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी मांडली. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नगरपंचायतीने हेल्पलाइन क्रमांक किंवा स्वतंत्र ॲप विकसित करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

शहरातील सार्वजनिक विहिरींमधील पाण्याचा काही व्यक्तींकडून मोटारीद्वारे उपसा करून बांधकामांसह इतर वैयक्तिक कामांसाठी वापर केला जात असल्याचा मुद्दा नगरसेविका दीपिका जाधव आणि सत्यजित पारकर यांनी सभागृहात उपस्थित केला. या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही करण्यात आली होती. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही, असा आरोप सत्यजित पारकर यांनी केला. या मुद्द्यावरून मुख्याधिकारी गौरी पाटील आणि सत्यजित पारकर यांच्यात जोरदार वादंग झाला. पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांना मुख्याधिकारी पाठिशी घालत असतील तर ही बाब आपण खपवून घेणार नाही, असा इशारा सत्यजित पारकर यांनी दिला.

भटक्या कुत्र्यांचा ठेका रद्द करण्याचा ठराव

भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताचे काम घेतलेल्या ठेकेदाराचे काम असमाधानकारक असल्याने त्याचा ठेका रद्द करण्याचा ठराव सभेत घेण्यात आला. तसेच वृक्ष प्राधिकरण समिती गठीत करणे, विकासकामांसाठी कंत्राटी स्वरूपात अभियंत्यांची नियुक्ती करणे, पाणीटंचाई निवारण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून त्यांची अंमलबजावणी करणे यासह विविध विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली.

You cannot copy content of this page