मिशन रेबीजच्या पथकाची तात्काळ कारवाई; दोन्ही कुत्र्यांना उपचार व पुढील कार्यवाहीसाठी गोवा येथे हलवले..

⚡सावंतवाडी ता.२७-: मळगाव ग्रामपंचायतीच्या शेजारी दोन संशयित रेबीजग्रस्त (पिसाळलेल्या) कुत्र्यांचा वावर असल्याचे निदर्शनास येताच मळगावमधील नागरिकांनी तत्परता दाखवत तात्काळ मिशन रेबीज संस्थेशी संपर्क साधला. नागरिकांच्या या सतर्कतेमुळे आणि मिशन रेबीजच्या पथकाने दाखवलेल्या तातडीच्या कार्यतत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याची चर्चा परिसरात होत आहे.
घटनेची माहिती मिळताच मिशन रेबीजचे शिक्षणाधिकारी अमित अशोक नाईक यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही कुत्र्यांची पाहणी करून त्यांच्या लक्षणांचा आढावा घेतला. दोन्ही कुत्र्यांमध्ये रेबीजची संशयास्पद लक्षणे आढळून आल्याने तातडीने पुढील कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर मिशन रेबीजचे IBCM अधिकारी वसंत विद्याधर तावडे हे देखील घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने मिशन रेबीजच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने योग्य ती खबरदारी घेत दोन्ही कुत्र्यांना सुरक्षितपणे पकडले.
सुरुवातीला दोन्ही कुत्र्यांना सावंतवाडी येथील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात, पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय सेवा आयुक्तालयांतर्गत नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचार आणि आवश्यक कार्यवाहीसाठी त्यांना गोवा येथील पणजी-टोंका परिसरातील रुग्णालयात हलविण्यात आले.
विशेष म्हणजे, मळगाव परिसरात जत्रेची पार्श्वभूमी असून आजूबाजूला शाळादेखील आहेत. अशा परिस्थितीत या कुत्र्यांचा वावर नागरिक, लहान मुले आणि भाविकांसाठी धोकादायक ठरू शकला असता. मात्र, स्थानिक नागरिकांनी दाखवलेली जागरूकता आणि मिशन रेबीजच्या टीमने केलेली तातडीची कारवाई यामुळे संभाव्य धोका वेळीच नियंत्रणात आणण्यात आला. यावेळी उपस्थित सामाजिक क्षेत्रातील सुधीर राऊळ, राजु परब, प्रेमनाथ राऊळ, नाना नेमळेकर इ. उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा रेबीजमुक्त करण्यासाठी मिशन रेबीजचे पाच वर्षांपासून प्रयत्न
मिशन रेबीज ही संस्था वर्ल्डवाइड व्हेटरनरी सर्व्हिस (WVS – Worldwide Veterinary Service) यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेबीज प्रतिबंधासाठी सातत्याने कार्यरत आहे. जिल्ह्यातील नागरिकांना रेबीज या प्राणघातक आजारापासून सुरक्षित ठेवणे आणि 2030 पर्यंत रेबीजमुक्तीचे ध्येय साध्य करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
या अंतर्गत भटक्या तसेच पाळीव कुत्र्यांचे मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण, नागरिकांमध्ये जनजागृती, शाळा-महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक कार्यक्रम, ग्रामपंचायत स्तरावर मार्गदर्शन आणि रेबीज संशयित कुत्र्यांबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही असे विविध उपक्रम राबवले जातात.
सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला यांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मिशन रेबीजची टीम सातत्याने कार्यरत आहे. कुत्र्यांचे वेळेवर लसीकरण करून रेबीजचा प्रसार रोखणे आणि मानव व प्राणी यांच्यातील सुरक्षित सहजीवन निर्माण करणे यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत.
या संपूर्ण कार्यामध्ये मिशन रेबीजचे शिक्षणाधिकारी अमित अशोक नाईक आणि IBCM अधिकारी वसंत विद्याधर तावडे यांचे मोलाचे योगदान आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असून आपल्या जिल्ह्याला रेबीजमुक्त करण्याच्या ध्येयाने ते सातत्याने कार्यरत आहेत.
नागरिकांना मिशन रेबीजचे आवाहन
आपल्या परिसरात एखादा कुत्रा अचानक आक्रमक होणे, विनाकारण चावण्याचा प्रयत्न करणे, असामान्य वर्तन करणे किंवा रेबीजची संशयास्पद लक्षणे दाखवणे असे आढळल्यास नागरिकांनी स्वतः त्या कुत्र्याला पकडण्याचा किंवा हाताळण्याचा प्रयत्न करू नये. तात्काळ मिशन रेबीजच्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.
मिशन रेबीज हेल्पलाइन : 7744029586
मळगावमधील नागरिकांनी दाखवलेली सतर्कता ही संपूर्ण समाजासाठी एक आदर्श उदाहरण आहे. रेबीजविरुद्धची लढाई केवळ एका संस्थेची नसून ती प्रशासन, नागरिक आणि पशुवैद्यकीय यंत्रणा यांच्या सामूहिक सहभागातूनच यशस्वी होऊ शकते.
मिशन रेबीजच्या संपूर्ण टीमचे, विशेषतः अमित अशोक नाईक, वसंत विद्याधर तावडे आणि बचाव पथकाचे या तत्पर कारवाईबद्दल मनःपूर्वक आभार. तसेच योग्य वेळी माहिती देऊन सामाजिक जबाबदारीचे भान दाखवणाऱ्या मळगावमधील सर्व जागरूक नागरिकांचेही विशेष अभिनंदन!
