Headlines

हरित लवादाचा निर्णय मालवणच्या किनारपट्टीवरील रहिवासी, मच्छिमार व व्यवसायिकांसाठी सकारात्मक-:आम. निलेश राणे…

⚡मालवण ता.२७-:
राष्ट्रीय हरित लवादच्या पुणे खंडपीठाने १७ नोव्हेंबर २०२६ रोजी दिलेला निर्णय हा मालवणच्या किनारपट्टीवरील पारंपरिक रहिवासी, मच्छीमार समाज आणि स्थानिक व्यावसायिकांच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक व दिलासादायक आहे. या आदेशात कोणालाही दोषी ठरवलेले नाही, कोणताही दंड आकारलेला नाही किंवा कोणत्याही बांधकामावर थेट कारवाईचे आदेश दिलेले नाहीत, असे आमदार निलेश राणे यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.

मालवण येथील ‘नीलरत्न’ बंगल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत आमदार निलेश राणे बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगरसेवक रविकिरण तोरसकर, बाबा परब, माजी नगरसेवक जॉन नरोन्हा, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहरप्रमुख राजु बिडये आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार निलेश राणे म्हणाले, याचिकाकर्ते श्री. हुले यांनी २०१९ पासून २०२५ पर्यंत किनारपट्टीच्या सर्वेक्षणाबाबत व विविध आक्षेपांवर सातत्याने तक्रारी आणि याचिका दाखल केल्या. २०१९, २०२३, २०२४ आणि २०२५ मध्ये विविध नोटिसा व तक्रारी झाल्या. या दरम्यान ७ मार्च २०२४ मालवण नगरपरिषद, मेरीटाईम बोर्ड, भूमी अभिलेख, तलाठी आणि एमसीझेडएमए यांसह प्रशासनाच्या ८ ते १० विभागांनी किनारपट्टीचे सर्वेक्षण करून हरित लवादासमोर सादरीकरण केले. हा सर्वेक्षणाचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या सर्व्हेत अनेक गोष्टी लवादाकडे सादर करण्यात आल्या. त्यावेळी या सर्व्हेकडे कोणी लक्ष दिले असते तर त्यातील अडचणी तेव्हाच हाताळता आल्या असत्या. मात्र तेव्हाच्या लोकप्रतिनिधीना हा विषय हाताळता आला नाही, त्यांना हा विषय समजला नाही, असेही आमदार निलेश राणे म्हणाले.

याबाबत पुणे खंडपीठाने १७ नोव्हेंबर २०२६ रोजी निर्णय दिला. या आदेशात प्रशासन, स्थानिक किंवा कोणतीही संस्था जबाबदार असल्याचे नमूद नाही. प्रशासनाने कोणताही दंड लावलेला नाही, किनारपट्टीवरील कोणत्याही बांधकामावर दंड लावलेला नाही. थेट कारवाईचा कोणताही आदेश दिलेला नसून पुढील सहा महिन्यांत प्रशासनाने व मालवण नगरपरिषदेने सर्वेक्षण पूर्ण करून अनधिकृत बाबी आढळल्यास त्याचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिले आहेत असे आमदार निलेश राणे यांनी सांगत हा निर्णय सकारात्मक कसा आहे हे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे याचिकाकर्त्याची याचिका फेटाळण्यात आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

किनारपट्टीवर पारंपारिक पद्धतीने राहणारे नागरिक व मच्छीमार बांधवांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे उभे आहोत. पारंपारिक व्यवसाय किंवा निवासाच्या बाबतीत प्रशासनाने कोणतीही गडबड केल्यास तीव्र उद्रेक होईल आणि आम्ही मच्छीमार समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, किनारपट्टीवर पारंपारिक पद्धतीने जे विषय चालतात त्यांना हात लावल्यास आम्हीच प्रशासनाच्या विरोधात उभे राहू, असा स्पष्ट इशारा जिल्हा प्रशासन, नगरपरिषद आणि एमसीझेडएमए अधिकाऱ्यांना आम्ही दिला आहे, असेही आम. राणे म्हणाले.

पर्यावरणाचे रक्षण राखत किनारपट्टीवरील घटकांना संरक्षण देणे हाच मुख्य उद्देश आहे. यामध्ये कोणावर अन्याय होणार नाही. पर्यावरणाचीही हानी होणार नाही. ज्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे व पुरावे आहेत, त्यांना घाबरण्याचे कारण नाही. येत्या तीन-चार महिन्यांत सर्वेक्षणातील बाबींवर प्रशासनासोबत चर्चा करून सहा महिन्यांनंतर सकारात्मक सादरीकरण केले जाईल. या कामात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, नगरपरिषद आणि नगरसेवक रविकिरण तोरसकर यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असेही आम. राणे यांनी सांगितले.

मला कोणत्याही श्रेयवादात जायचे नाही; तर किनारपट्टीचा हा गंभीर प्रश्न कायमस्वरूपी सुटणे महत्त्वाचे आहे. सोशल मीडियाच्या काळात कोण काय काम करते हे सर्वांनाच दिसते. प्रशासनाने आता कोर्टावर जबाबदारी न ढकलता किनारपट्टीचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडावी, असेही आम. राणे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page