Headlines

स्वतंत्र सिंधुदुर्ग जिल्हा देवस्थान व्यवस्थापन समिती निर्मितीचा संकल्प…

कोकणातील देवस्थानांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार नीलेश राणे यांना साकडे; विधिमंडळात प्रश्न मांडण्याचे आश्वासन..

⚡बांदा ता.२८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवस्थानांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अधिपत्यातून मुक्त करून स्वतंत्र सिंधुदुर्ग जिल्हा (कोकण) देवस्थान व्यवस्थापन समिती स्थापन करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील देवस्थानांचे मानकरी, सेवेकरी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या मागणीसाठी गाव र्‍हाटी पुरस्कृत देवस्थान समन्वय समितीच्या २१ गावांतील मानकऱ्यांनी कुडाळचे आमदार नीलेश राणे यांची भेट घेऊन देवस्थानांच्या समस्या मांडल्या. नागपूर येथील आगामी हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न विधिमंडळात मांडून सिंधुदुर्ग जिल्ह्याला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन आमदार राणे यांनी दिले. ही माहिती श्री विलास सावंत यांनी दिली.

सध्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अधिपत्याखाली सांगली, कोल्हापूरसह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील देवस्थाने आहेत. १९६९ मध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील देवस्थाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे वर्ग करण्यात आली. तेव्हापासून कोकणातील देवस्थानांचे मानकरी, सेवेकरी आणि पुजारी यांना साध्या कामांसाठीही कोल्हापूर येथील मुख्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याची तक्रार आहे.

देवस्थान व्यवस्थापन समितीची नियुक्ती करताना ग्रामसभा घेऊन त्यामध्ये ठरलेली कमिटी अधिकृत मानण्याची पद्धत सुरू झाली. तसेच कमिटीतील सदस्यांच्या वर्तनाबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयातून दाखला आणण्याची अट घालण्यात आली. यामुळे गावोगावी शेकडो वर्षांपासून शांततेत आणि सलोख्याने चालत आलेल्या बारा-पाच संप्रदायाच्या धार्मिक परंपरांमध्ये कलह निर्माण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

कोकणातील देवस्थानांमध्ये पारंपरिक रीतीरिवाजांनुसार मानकरी, सेवेकरी आणि पुजारी यांची नियुक्ती केली जाते. मात्र, ग्रामसभेतील बहुमताच्या प्रक्रियेमुळे देवस्थानांशी संबंध नसलेल्या किंवा धार्मिक परंपरांचा अनुभव नसलेल्या व्यक्तींनाही समितीत स्थान मिळविण्याची संधी निर्माण झाली. त्यामुळे पारंपरिक मानकरी व प्रमुख व्यक्तींना बाजूला सारून राजकीय मंडळी देवस्थानांच्या व्यवस्थापनात पुढे येऊ लागली. यामुळे देवस्थानांच्या मूळ धार्मिक रचनेला धक्का बसल्याची भावना मानकऱ्यांमध्ये निर्माण झाली असून मानपानावरून वाद वाढल्याचे सावंत यांनी सांगितले.

सावंतवाडीतून आंदोलनाची सुरुवात

या प्रश्नांबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे वारंवार पाठपुरावा करूनही तोडगा न निघाल्याने सावंतवाडी तालुक्यातील देवस्थानांच्या मानकऱ्यांची सभा सावंतवाडी संस्थानाचे युवराज लखमराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि विलास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी राजवाड्यात झाली. या सभेत अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी सावंतवाडी तालुका देवस्थान व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली.

या समितीच्या अध्यक्षपदी एल. एम. सावंत, उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर परब, सचिवपदी बाळू उर्फ राजाराम सावंत, उपसचिवपदी वसंत धुरी आणि खजिनदारपदी विलास गवस यांची निवड करण्यात आली. समितीचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर प्रशासक, जिल्हाधिकारी तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव नाईकवडे यांच्याशी बैठका घेऊन चर्चा करण्यात आली. मात्र, आश्वासनांपलीकडे काहीही निष्पन्न झाले नाही.

देवस्थान समितीच्या मनमानी कारभारामुळे आणि मानकरी व पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने जिल्ह्यातील देवस्थान समित्यांनी एकत्र येत आंदोलनाची भूमिका घेतली. महाराष्ट्र मंदिर महासंघाचीही या आंदोलनाला साथ मिळाली. सावंतवाडी आणि माणगाव येथे देवस्थान समित्यांच्या पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेण्यात आले. यावेळी स्वतंत्र सिंधुदुर्ग जिल्हा देवस्थान व्यवस्थापन समिती स्थापन करण्याची मागणी एकमताने करण्यात आली.

मंत्रालयातील बैठकीत स्वतंत्र समितीची मागणी

या मागणीच्या अनुषंगाने ३० सप्टेंबर २०२५ रोजी विधी व न्यायमंत्री आशिष जयस्वाल यांनी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत विलास सावंत (डिंगणे) आणि शिवराम देसाई (डेगवे) यांनी सिंधुदुर्गातील देवस्थानांच्या समस्या आणि स्वतंत्र समितीची आवश्यकता सविस्तर मांडली.

कोकणातील देवस्थाने बारा-पाच संप्रदायाच्या परंपरांनुसार चालत असून त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील देवस्थानांच्या परंपरांशी मेळ नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० मधील तरतुदी, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २६ नुसार धार्मिक समुदायांना असलेले अधिकार तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या मंदिर व्यवस्थापनासंदर्भातील निर्णयांचा आधार घेत स्वतंत्र समितीची मागणी करण्यात आली.

कोकणातील देवस्थानांमध्ये वर्षभरात सुमारे ४० ते ५० उत्सव साजरे होतात. मात्र, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या हस्तक्षेपामुळे धार्मिक उत्सवांच्या आयोजनात व्यत्यय येत असल्याचेही बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले. या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर मंत्री जयस्वाल यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतून मुक्त करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते.

१४ महिन्यांनंतरही प्रश्न प्रलंबित

मंत्री जयस्वाल यांच्या बैठकीनंतर १४ महिने उलटूनही स्वतंत्र देवस्थान व्यवस्थापन समितीचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. जिल्ह्यातील आमदार आणि पालकमंत्र्यांची भेट घेऊन तसेच निवेदने देऊनही ठोस निर्णय न झाल्याने देवस्थान समन्वय समितीने आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

गाव र्‍हाटी पुरस्कृत देवस्थान समन्वय समितीच्या २१ गावांतील मानकऱ्यांच्या नेतृत्वाखाली पंढरी राऊळ (माजी जिल्हा परिषद सदस्य) आणि ज्ञानेश्वर परब यांनी आमदार नीलेश राणे यांची भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना अध्यक्ष संजू परब आणि पत्रकार सीताराम गावडे उपस्थित होते.

या भेटीदरम्यान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचत जिल्ह्यातील सर्व देवस्थानांच्या समस्या आमदार राणे यांच्यासमोर मांडण्यात आल्या. यावेळी कविटकर, बाळा राऊळ, सचिन, लक्ष्मण सावंत (सांगेली), राजाराम शिंदे, संतोष राणे, मंगेश आंगचेकर (आंबेगाव) आदी मान्यवर उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवस्थानांना स्वतंत्र व्यवस्थापन समिती मिळणे ही केवळ प्रशासकीय मागणी नसून कोकणातील पारंपरिक धार्मिक परंपरा, देवस्थानांची स्वायत्तता आणि मानकरी-सेवेकऱ्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आवश्यक असल्याची भूमिका विलास सावंत यांनी मांडली. स्वतंत्र सिंधुदुर्ग जिल्हा देवस्थान व्यवस्थापन समिती स्थापन होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

You cannot copy content of this page