Headlines

मोरगाव शाळेत रानभाजी प्रदर्शन व विक्री उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.०६-:
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मोरगाव नं. १ येथे विद्यार्थ्यांमध्ये स्थानिक जैवविविधता, पारंपरिक आहारसंस्कृती आणि पौष्टिक रानभाज्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘रानभाजी प्रदर्शन व विक्री’ या उपक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात आढळणाऱ्या विविध रानभाज्या संकलित करून त्यांचे आकर्षक प्रदर्शन मांडले. कुरडू, टाकळा, भारंगी, अळू, सुरण, फोडशी, करटुला, शेवगा अशा पावसाळी रानभाज्यांची माहिती फलकांसह मांडणी करण्यात आली. प्रत्येक रानभाजीचे स्थानिक नाव, ओळख, पौष्टिक मूल्य, औषधी गुणधर्म, तसेच त्यापासून तयार होणारे विविध खाद्यपदार्थ यांची माहिती विद्यार्थ्यांनी उपस्थितांना आत्मविश्वासाने सांगितली.
प्रदर्शनासोबतच रानभाज्यांची विक्रीही करण्यात आली. पालक, ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर रानभाज्यांची खरेदी केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना उद्योजकता, संवादकौशल्य, आर्थिक व्यवहाराचे प्राथमिक ज्ञान तसेच स्थानिक नैसर्गिक संपत्तीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली.
पावसाळी रान भाज्यांची आपल्या आहारातील गरज व उपयुक्तता याविषयी शिक्षक संतोष गवस यांनी मार्गदर्शन केले . शिक्षिका स्वाती पाटील यांनी या रानभाज्यांपासून विविध पदार्थ बनवून ते मुलांच्या आहारात कसे आणता येईल याबाबत सुंदर कल्पना मांडल्या.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उदय ठाकूर, उपाध्यक्षा सिद्धी कर्पे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अभिमन्यू ठाकूर, मुख्याध्यापिका भाग्यश्री कुबल, शिक्षक ज्ञानेश्वर सावंत , संतोष गवस, स्वाती पाटील , सर्व पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व सादरीकरणाचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव, आरोग्यदायी आहाराची सवय आणि स्थानिक परंपरांविषयी अभिमान निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात आले.

You cannot copy content of this page