३ लाख ८४ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त…
मालवण दि प्रतिनिधी
मालवण तालुक्यात अवैद्य दारुवर धंद्यांवर कारवाई करण्याचा सपाटा मालवण पोलिसांनी सुरू ठेवला असून मालवण दांडी, देवबाग येथील दारू अड्डयावरील छापेमारी नंतर मालवण पोलिसांनी आपली वक्रदृष्टी सुकळवाड येथे वळवितानाच सुकळवाड येथे काल बुधवारी रात्री टाकलेल्या छाप्यात तब्बल ३,८४,३०० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे . या प्रकरणी प्रमोद मुसळे व चेतन प्रमोद मुसळे (दोघेही रा. सुकळवाड, ता. मालवण) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालवण तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूची अवैध विक्री व साठवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम तीव्र केली आहे. अवैध दारू व्यवसायाला पूर्णपणे आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी छापेमारी सत्र सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून सुकळवाड येथे ही मोठी कारवाई करण्यात आली.
छापेमारी दरम्यान पोलिसांच्या पथकाला घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीच्या दारूचा साठा आढळून आला. पोलिसांनी सर्व साठा तातडीने जप्त केला असून, त्याची बाजारभावानुसार एकूण किंमत ३,८४,३०० रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सुकळवाड येथे हा छापा टाकला. या पथकात पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत, पोलीस उपनिरीक्षक अभिजित भोसले, हेड कॉन्स्टेबल सुहास पांचाळ, हेड कॉन्स्टेबल सुप्रिया पवार आणि हेड कॉन्स्टेबल सोनाली पाटकर यांचा समावेश होता.
मालवण पोलिसांकडून तालुक्यात सातत्याने होत असलेल्या या कठोर कारवाईमुळे अवैध दारू विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सीमावर्ती भागातून होणाऱ्या गोवा बनावटीच्या दारूच्या बेकायदेशीर वाहतुकीवर व साठवणुकीवर पोलिसांची करडी नजर आहे. आगामी काळातही अशा अवैध व्यवसायांविरोधातील मोहिमा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत.

