Headlines

वैभव नाईकांचे आरोप पराभवाच्या नैराश्यातून…

युवासेना जिल्हाप्रमुख विजय इंगळेंचा पलटवार:१० वर्षांत कुडाळसाठी एक तरी नवीन एमआयडीसी आणली का..,हिंमत असेल तर एमआयडीसीच्या गेटवर येऊन समोरासमोर हिशेब करूया..

⚡कणकवली ता.०५-: कुडाळ – मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्यावर केलेले आरोप हे पराभवाच्या नैराश्यातून केलेले बिनबुडाचे आरोप आहेत. दुसऱ्यांचा हिशेब मागण्यापूर्वी वैभव नाईक यांनी स्वतःच्या दहा वर्षांच्या कार्यकाळाचा हिशेब द्यावा, असा जोरदार पलटवार युवासेना जिल्हाप्रमुख विजय इंगळे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

नारायण राणे साहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला काय दिले, हे संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती, वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग किल्ला विकास, आंबोली घाट रस्ता आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एमआयडीसीची निर्मिती ही राणे साहेबांची देणगी आहे. मात्र, वैभव नाईक यांनी दहा वर्षांच्या आमदारकीच्या काळात कुडाळसाठी एक तरी नवीन एमआयडीसी मंजूर करून आणली का, असा सवाल इंगळे यांनी उपस्थित केला आहे.

राणे कुटुंबाच्या कंपन्या असल्याचा आरोप फेटाळताना त्यांनी म्हटले आहे की, संबंधित कंपन्यांनी घेतलेल्या जागा या राणे साहेबांनी आणलेल्या उद्योगांसाठी आहेत. या जागा ओसाड नसून त्यावर प्रक्रिया सुरू आहे. वैभव नाईक यांनी कोणत्या कंपनीने, केव्हा आणि किती जागा घेतली, याची पुराव्यासह माहिती जाहीर करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.

गोदरेज आणि बजाज राईस मिलसारख्या उद्योगांचे प्रस्ताव २०१२-१३ मधील असून त्यावेळी नारायण राणे उद्योगमंत्री होते. वैभव नाईक यांनी केवळ उद्घाटनाच्या फिती कापल्या. आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात एकही मोठा ब्रँडेड उद्योग आणता आला नाही, असा आरोप इंगळे यांनी केला. केवळ नारळ फोडून आणि छायाचित्रे काढून विकास होत नसतो, अशी टीकाही त्यांनी केली.

कुडाळ एमआयडीसीतील ३० कोटींच्या रस्त्याच्या कामावरून कमिशनचा आरोप करणे चुकीचे असून एमआयडीसीचे रस्ते शासनाच्या ई-टेंडरिंग प्रक्रियेद्वारे केले जातात. आमदारांच्या खिशातून ही कामे होत नाहीत. वैभव नाईक यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पुरावे द्यावेत, अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असा इशाराही इंगळे यांनी दिला. वैभव नाईक आमदार असताना एमआयडीसीमध्ये ३० लाखांचा तरी रस्ता केला होता का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कुडाळ एमआयडीसीच्या गेटवर समोरासमोर हिशेब करण्याचे आव्हान

हिंमत असेल तर वैभव नाईक यांनी कुडाळ एमआयडीसीच्या गेटवर यावे. समोरासमोर हिशेब करूया. दहा वर्षांत आपण काय केले आणि एका वर्षात आमदार निलेश राणे काय करत आहेत, हे जनताच ठरवेल, असे खुले आव्हान विजय इंगळे यांनी दिले.

आमदार निलेश राणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या एका वर्षात कुडाळ एमआयडीसीला २१ व्या शतकाचे रूप देण्यासाठी ३० कोटींचा डीपी प्लॅन तयार करण्यात आला असून पाणी, वीज, ड्रेनेज आणि नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या दहा वर्षांत जे झाले नाही, ते आता होत असल्याचा दावा इंगळे यांनी केला आहे.

‘तुम्ही फेक नरेटिव्हचे बादशहा आहात, आम्ही विकासाचे वाघ आहोत. पोकळ आरोप बंद करा आणि विकासावर बोला,’ अशा शब्दांत युवासेना जिल्हाप्रमुख विजय इंगळे यांनी वैभव नाईक यांच्यावर निशाणा साधला आहे.

You cannot copy content of this page