पाच बंडल केबलसह वाहनेही जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई

कणकवली : तालुक्यातील ओसरगाव-गवळवाडी येथे तब्बल ५७ लाख ४० हजार ९९५ रुपये किमतीच्या ॲल्युमिनियम लाईट केबलची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास करत सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने राजस्थान आणि हरियाणा राज्यातील तीन संशयितांना चोरीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. गुरुवारी (ता. ५) करण्यात आलेल्या या कारवाईमुळे मोठी चोरी उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
ओसरगाव, गवळवाडी येथे ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजल्यापासून ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाली. यामध्ये ॲल्युमिनियम लाईट केबलचे पॅकिंगसह एकूण पाच बंडल चोरीस गेले होते. या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये ५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.४९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू करण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती, मानवी कौशल्य आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला.
या तपासादरम्यान इरशाद खुर्शीद खान (वय ३२, रा. हमिर्राका, ता. तिजारा, जि. अलवर, राजस्थान), आरिफ खुर्शीद खान (वय ३०, रा. निमखेडा, बडेड, मेवात, हरियाणा) आणि शाहीद खुर्शीद खान (वय २४, रा. निमखेडा, बडेड, मेवात, हरियाणा) या तिघांना त्यांच्या ताब्यातील वाहनांसह तसेच चोरीस गेलेल्या पाच बंडल केबलसह ५ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या तिन्ही संशयितांची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी त्यांना कणकवली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस फौजदार सुरेश राठोड, राजेंद्र जामसंडेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण देसाई, राजेंद्र गोसावी, आशिष जामदार आणि पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर यांचा समावेश होता.
