पारंपरिक जपणुकीसोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश; ९ नोव्हेंबरपर्यंत नावनोंदणीची संधी

बांदा/प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धनासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास आणि पारंपरिक कलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदा पंचक्रोशी यांच्या वतीने बांदा शहर मर्यादित पर्यावरणपूरक किल्ले स्पर्धा आणि पर्यावरणपूरक व पारंपरिक नाविन्यपूर्ण आकाश कंदील स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही स्पर्धा १५ वर्षांखालील वयोगटासाठी आयोजित करण्यात आल्या आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या स्पर्धांमधून मुलांच्या सर्जनशीलतेला, कल्पकतेला आणि कलागुणांना वाव मिळणार आहे. पर्यावरणाला हानी न पोहोचवता नैसर्गिक व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करून किल्ले आणि आकाश कंदील तयार करण्यास प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
स्पर्धेची प्रत्यक्ष तपासणी १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून करण्यात येणार आहे. स्पर्धकांनी ९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. दोन्ही स्पर्धांसाठी स्वतंत्र पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी १ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७५० रुपये, तृतीय क्रमांकासाठी ५०० रुपये, तर उत्तेजनार्थ ३०० रुपये असे पारितोषिकांचे स्वरूप आहे.
या स्पर्धेत अधिकाधिक बालस्पर्धकांनी सहभागी होऊन पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश द्यावा, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक विकास मंचाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी गुरुनाथ नार्वेकर (९४२२३७९३४६ / ८८५०७९३४६), जगन्नाथ सातोसकर (७३८७८९०५६९), निकिता मोरजकर (९४२१०८३३८३) आणि हनुमंत मालवणकर (९४२१६२१५६८) यांच्याशी संपर्क साधावा.
‘पर्यावरणासाठी – परंपरेला जपण्यासाठी’ या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमाला बांद्यातील बालक व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
