Headlines

वेंगुर्त्यात 5 रोजी किरातच्या शतायुषी वाटचालीचा जागर…

‘वाचू आनंदे’ उपक्रमांतर्गत साहित्य संवाद : १०४ वर्षांची;कारकिर्द उलघडणार, दिवाळी अंकाचेही प्रकाशन..

⚡वेंगुर्ला ता.०४-: काळ बदलला, पिढ्या बदलल्या, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत अनेक स्थित्यंतरे घडली, मात्र या साऱ्या बदलांची साक्ष आपल्या शब्दांतून जपणारे साप्ताहिक किरात आजही वेंगुर्ल्याच्या जनमानसात आपले स्थान टिकवून आहे. वेंगुर्ल्याच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि साहित्यिक जडणघडणीचा साक्षीदार असलेल्या किरातच्या १०५ वर्षांच्या समृद्ध वाटचालीचा गौरव करण्यासाठी ‘वाचू आनंदे’ या उपक्रमांतर्गत ‘किरात नाबाद १०४’ या विशेष साहित्य संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता नगर परिषद वेंगुर्ले येथील स्वामी विवेकानंद कौशल्य विकास सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. ‘शतकाची साक्ष, वेंगुर्त्याचा श्वास!’ या भावस्पर्शी संकल्पनेतून किरातच्या ऐतिहासिक प्रवासाला उजाळा देण्यात येणार आहे. साप्ताहिक किरातने केवळ बातम्यांचे माध्यम म्हणून भूमिका बजावली नाही, तर वेंगुर्ल्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील -अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा ऐतिहासिक दस्तऐवज जपला आहे. साहित्यविषयक अभिरुची निर्माण करणे, नवोदित लेखकांच्या लेखणीला प्रोत्साहन देणे, नामवंत साहित्यिकांचे साहित्य वाचकांपर्यंत पोहोचविणे आणि दिवाळी अंकाच्या माध्यमातून नव्या साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, असे बहुआयामी योगदान किरातने दिले आहे.

एका साप्ताहिकाचा इतिहास म्हणजे केवळ पत्रकारितेचा प्रवास नसून तो एका शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक जडणघडणीचा दस्तऐवज असतो. हीच जाणीव नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासह वाचनसंस्कृतीचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित या साहित्य संवादात वाचक, साहित्यप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘वाचू आनंदे’ परिवार, मुक्तांगण महिला मंच आणि साप्ताहिक किरात परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page