सावंतवाडी : सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांसोबतच आता शैक्षणिक क्षेत्रातही विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही सावंतवाडी शहरासह तालुक्यातील मराठी शाळांना भेट देऊन शाळांमधील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व भेटवस्तूंचे वितरण करण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत सावंतवाडी शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ५ येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळेला बसण्यासाठी चटईही भेट देण्यात आली.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सचिव समीरा खलील, रूपा मुद्राळे, शरदिनी बागवे आणि हेलन निबरे यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम यशस्वी केला.
यावेळी शाळेतील शिक्षिका संगीता भिरवंडेकर आणि शुभलता सुखी यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाबद्दल संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले.
याप्रसंगी संस्थेच्या सचिव समीरा खलील, रूपा मुद्राळे, शरदिनी बागवे, हेलन निबरे, उपाध्यक्ष विजय वाडकर तसेच शाळेतील शिक्षिका उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे शाळेतून स्वागत करण्यात आले.
