Headlines

कणकवली कणकनगर येथील केटी बंधाऱ्यात लोखंडी प्लेटा बसविल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ

कणकवली : जिल्ह्यात निर्माण झालेली संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा निर्माण करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्या. त्यामध्ये वनराई बंधारे व नदीवरील बंधाऱ्यांमध्ये प्लेट लावून पाणी अडवणे, त्यांच्यासह विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील गडनदीवरील कनकनगर मंडळ येथील केटी बंधाऱ्यात लोखंडी प्लेटा बसविण्यात आल्याने नदीतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. प्लेटा बसविल्यानंतर बंधाऱ्यात पाणी तुडुंब साठल्याचे मनमोहक चित्र दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

गडनदी ही कणकवली शहरासाठी महत्त्वाचा जलस्रोत आहे. पावसाळ्यात नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून समुद्राला मिळते. हे पाणी योग्य ठिकाणी अडवून त्याचा साठा निर्माण केल्यास भविष्यात पाणी टंचाईच्या काळात त्याचा फायदा होऊ शकतो. याच उद्देशाने नदीवरील केटी बंधाऱ्यांमध्ये लोखंडी प्लेटा बसविण्याची आवश्यकता होती.

यासाठी नगराध्यक्ष संदेश पारकर, तहसिलदार दीक्षांत देशपांडे , मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी स्वत: केटी बंधाऱ्यावर भेट देवून पाहणी केली होती. त्यानंतर पाणी अडवण्यासाठी बंधाऱ्यावर प्लेटा टाकण्यात आल्या. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. लगतधारक असलेल्या नागरिकांच्या विहिरी व पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.

You cannot copy content of this page