जिल्ह्यातील ५६ हवामान केंद्रांची आठ दिवसांत संयुक्त पाहणी करा; कृषी सभापती दादा साईल यांचे आदेश; कृषी समिती सभेत सदस्यांचा आक्षेप..

⚡ओरोस, ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही हवामान केंद्रे चुकीच्या ठिकाणी बसविण्यात आल्याने प्रत्यक्षात पिकांचे नुकसान होऊनही विमाधारक शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहत असल्याचा गंभीर मुद्दा जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत उपस्थित करण्यात आला. यावर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत चुकीच्या ठिकाणी असलेली केंद्रे स्थलांतरित करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व ५६ हवामान केंद्रांची कृषी सहाय्यक, विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि संबंधित लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संयुक्त पाहणी करून आठ दिवसांत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा परिषद कृषी समितीची मासिक सभा आज येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती दादा साईल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सचिव तथा कृषी विकास अधिकारी दीक्षांत कोळप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, समिती सदस्य अक्षता गावडे, सुयोगी घाडी, शोभा गावडे, सुजाता पडवळ, विजय नाईक यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यात पीकविम्याच्या अनुषंगाने ५६ ठिकाणी हवामान केंद्रे उभारण्यात आली आहेत. मात्र, यातील काही केंद्रांची जागा निवडताना स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा योग्य विचार झालेला नसल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. चुकीच्या ठिकाणी केंद्रे असल्यामुळे संबंधित परिसरातील प्रत्यक्ष हवामानाची अचूक नोंद होत नसल्याचे सदस्यांचे म्हणणे होते. परिणामी, पिकांचे नुकसान होऊनही विमाधारक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यात अडचणी येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावर सभेत सविस्तर चर्चा झाली. चुकीच्या ठिकाणी असलेली हवामान केंद्रे योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणीही करण्यात आली. त्यानंतर सभापती साईल यांनी सर्व केंद्रांची संयुक्त तपासणी करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, जिल्ह्यात सुमारे ५१ हजार हेक्टर क्षेत्र भात लागवडीखाली येण्याची क्षमता असताना यंदा प्रत्यक्षात केवळ २६ हजार ५६५ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. दुष्काळी परिस्थितीचा भातशेतीला मोठा फटका बसला असून प्रशासनाने नुकसानीचे शंभर टक्के पंचनामे पूर्ण केल्याची माहिती सभेत देण्यात आली. मात्र, शासनाकडून मंजूर होणारी नुकसानभरपाई अपुरी असल्याने शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळावी, असा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.
पावसाने बंधारे फुटल्यास तातडीने दुरुस्ती करा!
जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत. मात्र, सध्या जिल्ह्याच्या काही भागांत जोरदार पाऊस पडत असल्याने हे बंधारे फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा ठिकाणी बंधारे फुटल्यास त्यांची तातडीने दुरुस्ती करून साठविलेले पाणी वाया जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सभापती दादा साईल यांनी केले. दुष्काळाच्या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
