स्व. भागीरथी पेडणेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त धार्मिक, सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन; नंदकुमार पेडणेकर यांनी जपली गावच्या माणसांशी नाळ

देवगड (प्रतिनिधी)
स्व. भागीरथी तुकाराम पेडणेकर यांच्या प्रेमळ स्वभावाचा, वात्सल्याचा आणि सेवाभावी संस्कारांचा वारसा पुढे नेत त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त वात्सल्य मूर्ती स्वर्गीय भागीरथी तुकाराम पेडणेकर सेवा संस्था, मुंबई यांच्या वतीने देवगड तालुक्यातील खालची खाक्षीवाडी येथे विविध धार्मिक, सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत वाडीतील सुमारे १०० महिला व पुरुषांना दिवाळीची भेट म्हणून मिठाई आणि भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. गावातील माणसांशी असलेली आपुलकीची नाळ जपत नंदकुमार पेडणेकर यांनी सामाजिक बांधिलकीचा अनोखा प्रत्यय या माध्यमातून दिला.
कार्यक्रमाची सुरुवात वात्सल्य मूर्ती स्वर्गीय भागीरथी तुकाराम पेडणेकर यांच्या प्रतिमेला संस्थेचे संस्थापक नंदकुमार पेडणेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर वाडीतील पाच भगिनींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थितांनी प्रतिमेचे पूजन करून स्व. भागीरथी पेडणेकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी कोकण कट्टा संस्थेचे संस्थापक अजित पितळे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मनोगतात पेडणेकर यांनी स्थापन केलेल्या संस्थेची ओळख, संस्थेचा उद्देश आणि भविष्यातील कार्याची व्याप्ती याबाबत सविस्तर माहिती उपस्थित ग्रामस्थांना करून दिली.
संस्थेचे संस्थापक नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी बोलताना नंदकुमार पेडणेकर म्हणाले की, “माझ्या वाडीतील नागरिक म्हणजे माझी घरचीच मंडळी आहेत. त्यामुळे या सेवाकार्याची सुरुवात मी माझ्या वाडीपासून केली. नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक झालो असलो तरी गावची ओढ कधीही कमी झालेली नाही आणि होणारही नाही. तुमच्यासारखी आशीर्वाद देणारी माणसे पाठीशी असल्याने नेहमी पुढे जाण्याची प्रेरणा मिळते.” त्यांच्या या भावनिक मनोगतातून गावाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि सामाजिक कार्याची तळमळ व्यक्त झाली.
२ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थापन झालेल्या वात्सल्य मूर्ती स्वर्गीय भागीरथी तुकाराम पेडणेकर सेवा संस्थेने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात विविध सेवाभावी उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. ‘सेवा धर्मातून जपूया वात्सल्याचा वारसा’ हे ब्रीदवाक्य घेऊन संस्थेने आपल्या कार्याची सुरुवात केली आहे. स्व. भागीरथी पेडणेकर यांच्या स्मृती केवळ औपचारिक कार्यक्रमांपुरत्या मर्यादित न ठेवता त्यांच्या संस्कारांतून समाजोपयोगी कार्य उभे करण्याचा संस्थेचा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.
या कार्यक्रमाला कोकण कट्टा संस्थेचे संस्थापक अजित पितळे, नंदकुमार पेडणेकर, प्रभाकर राणे, आबा पेडणेकर, माजी नगरसेविका सौ. विशाखा पेडणेकर यांच्यासह वाडीतील ग्रामस्थ, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवाळीच्या निमित्ताने मिळालेल्या भेटवस्तूंमुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. वात्सल्याच्या आठवणींना समाजसेवेची जोड देत गावच्या माणसांशी नाते जपणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले.
