आरटीओचे वेधणार लक्ष:डीवायएसपी दीपक शेलार यांचे रिक्षा व्यवसायिकांना आश्वासन..

⚡मालवण ता.०३-:
मालवण शहरासह देवबाग, तारकर्ली, वायरी आणि पंचक्रोशी परिसरात विनापरवाना सुरू असलेल्या भाडेतत्त्वावरील दुचाकी व्यवसायाविरोधात आक्रमक बनलेल्या मालवण शहरातील रिक्षा व्यवसायिकानी आज मालवण पोलीस ठाण्याचे प्रभारी तथा डीवायएसपी दीपक शेलार यांची भेट घेऊन या बेकायदेशीर व्यवसायामुळे परवानाधारक रिक्षा व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असून, या समस्येवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. यावर दीपक शेलार यांनी विनापरवाना दुचाकी भाड्याने देण्याचा व्यवसाय होत असल्यास ते चुकीचे असल्याचे सांगत कारवाई करण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच याबाबत आरटीओ विभागाचे लक्ष वेधून लवकर आरटीओ आणि रिक्षा चालक यांची बैठक घेण्यात येईल असे आश्वासन डीवायएसपी शेलार यांनी दिले.
मालवण शहर रिक्षा चालक-मालक संघटनेच्या शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर केले. यावेळी मालवण शहर रिक्षा चालक-मालक संघटनेचे प्रतिनिधी तसेच अनेक रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.
मालवण शहरासह देवबाग, तारकर्ली आणि वायरी परिसरात खासगी दुचाकी मालक कोणतेही आवश्यक कायदेशीर परवाने न घेता पर्यटकांना दुचाकी भाड्याने देत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या व्यवसायासाठी ठिकठिकाणी जाहिरात फलकही लावण्यात आले असून, त्यामुळे परवानाधारक रिक्षा व्यावसायिकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. रिक्षा व्यावसायिक आरटीओचे नियम पाळून, आवश्यक कर भरून तसेच वाहनांचे पासिंग आणि इन्शुरन्स करून व्यवसाय करतात. मात्र, विनापरवाना सुरू असलेल्या रेंटल बाईक व्यवसायामुळे पर्यटक रिक्षांऐवजी दुचाकींना पसंती देत असल्याने रिक्षाचालकांना प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. परिणामी, वाहनांचे हप्ते, विमा आणि दैनंदिन खर्च भागविणेही अवघड झाले आहे, असे यावेळी रिक्षा व्यवसायिकानी सांगितले.
तसेच भाड्याने देण्यात येणाऱ्या बऱ्याच दुचाकी बाहेरून आणलेल्या आहेत. काही गाड्यांवर नंबर प्लेट नसतात तसेच कागदपत्रेही नसतात. आम्ही परवाना घेऊन रिक्षा व्यवसाय करत असताना अशा दुचाकी कोणत्या आधारावर भाड्याने दिल्या जातात असा सवाल यावेळी रिक्षा व्यवसायिकानी केला. त्याचप्रमाणे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक रस्त्यांची तसेच खडतर चढ-उतारांची पुरेशी माहिती नसते. अशा परिस्थितीत दुचाकींचा वापर करताना अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे हा प्रश्न केवळ रिक्षा व्यावसायिकांच्या रोजगारापुरता मर्यादित नसून पर्यटकांच्या सुरक्षिततेशीही संबंधित असल्याचे रिक्षा व्यवसायिकानी सांगितले.
या निवेदनाची दखल घेत परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांनी संबंधित विषयावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाला तातडीने पत्र पाठविण्यात येईल, असे सांगितले. तसेच आरटीओ अधिकाऱ्यांसोबत रिक्षा व्यावसायिकांची संयुक्त बैठक घेऊन या प्रकरणात योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, रिक्षा व्यावसायिकांनी कोणताही कायदा हातात घेऊ नये. विनापरवाना दुचाकी भाड्याने देणाऱ्यांविरोधात नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असेही शेलार यांनी स्पष्ट केले.
बेकायदेशीर दुचाकी भाडेव्यवसायावर तातडीने कायदेशीर कारवाई न झाल्यास संपूर्ण मालवण तालुक्यातील रिक्षा व्यवसाय बंद करून उपोषणाला बसण्याचा इशारा रिक्षा चालक-मालक संघटनेने दिला आहे.
