बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर:महेश जावकर यांनी कितीही राजकारण करत राहिले तरी आमच्यासाठी जनतेला अपेक्षित असलेला विकास आणि मागण्या पूर्ण करणे हेच एकमेव प्राधान्य राहणार..

⚡मालवण ता.०३-:
मालवण शहरातील विकासकामांमध्ये अडथळा निर्माण करणे आणि खोट्या अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करणे, हेच उद्योग सध्या ठाकरे गटाकडून सुरू आहेत. मेढा भागात जनतेने आधीच नाकारलेले महेश जावकर नळ पाणी योजनेच्या मुद्द्यावरून स्वार्थी राजकारण करत आहेत, असा जोरदार निशाणा नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी साधला आहे. मात्र, मालवणची जनता सुज्ञ असून त्यांच्या असल्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
मेढा, राजकोट, कोतेवाडा आणि संपूर्ण मालवण शहर परिसरात उच्च दाबाने मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात नगरपरिषदेच्या माध्यमातून आपण कटिबद्ध आहोत, अशी ठाम भूमिका सभापती सहदेव बापर्डेकर यांनी स्पष्ट केली.
नव्या नळपाणी योजनेमध्ये राजकोट व परिसरासाठी स्वतंत्र उच्च दाबाची पाईपलाईन प्रस्तावित करण्यात आली असून याद्वारे नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा केला जाणार आहे. जनतेच्या हिताचा विचार करूनच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार प्रत्यक्षात कार्यवाहीही सुरू आहे. असे असतानाही महेश जावकर यांनी “मी बोललो म्हणूनच हे काम झाले,” असे भासवून आपल्यामुळेच सर्व झाल्याचा केविलवाणा श्रेयवादाचा प्रयत्न सुरू ठेवला आहे, अशी टीका बापर्डेकर यांनी केली.
महेश जावकर यांनी यापुढेही हवे तर राजकारण करत राहावे, परंतु आमच्यासाठी जनतेला अपेक्षित असलेला विकास आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करणे हेच एकमेव प्राधान्य राहणार आहे. जनतेला कोणतीही समस्या निर्माण होऊ नये आणि उद्भवलेल्या समस्या तात्काळ सुटाव्यात, यासाठीच आपण सेवक म्हणून कार्यरत राहू, असे सभापतींनी स्पष्ट केले. तसेच, यापुढे महेश जावकर यांच्या कोणत्याही खोट्या व दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांना उत्तरात वेळ वाया घालवणार नाही, आपली खरी बांधिलकी केवळ जनतेशीच असेल, असा सज्जड इशाराही सहदेव बापर्डेकर यांनी दिला आहे.
