Headlines

शहरात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानची विस्तारित ओपीडी सुरू होणार…

५ नोव्हेंबरला मोफत आरोग्य शिबिरातून शुभारंभ; दर मंगळवार व शुक्रवारी मिळणार आयुर्वेदिक उपचारांची सुविधा..

⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी व परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी असून, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात विस्तारित बाह्यरुग्ण विभाग (एक्स्टेंशन ओपीडी) सुरू करण्यात येत आहे. गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून या ओपीडी सेवेचा शुभारंभ होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता आयुर्वेदिक उपचार व आरोग्यविषयक सल्ला स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे.

या उद्घाटन समारंभाला आमदार दीपकभाई केसरकर, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे संचालक प्रो. वैद्य प्रदीपकुमार प्रजापती, अधिष्ठाता प्रो. डॉ. सुजाता कदम, सावंतवाडी नगराध्यक्षा श्रद्धा लखमराजे भोसले, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.

या विस्तारित ओपीडी केंद्रामार्फत पुढील आठवड्यापासून नियमित आरोग्यसेवा सुरू करण्यात येणार आहे. दर मंगळवार आणि शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत नागरिकांना ओपीडीची सुविधा उपलब्ध असेल. आयुर्वेदिक उपचार, आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय मार्गदर्शनाचा लाभ या माध्यमातून नागरिकांना घेता येणार आहे.
सावंतवाडी शहरासह तालुक्यातील आणि परिसरातील नागरिकांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार असून, नागरिकांनी ५ नोव्हेंबर रोजी आयोजित मोफत आरोग्य शिबिरासह नियमित ओपीडी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
ओपीडी केंद्राचा पत्ता : बॅ. नाथ पै बहुउद्देशीय सभागृहासमोर, भाजी मंडई इमारतीचा पहिला मजला, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.

You cannot copy content of this page