ग्रामपंचायत वाफोलीच्या संपूर्ण सहभागातून आठ माहितीपर स्टॉलचे आयोजन…

⚡बांदा ता.०४-: एकात्मिक बालविकास सेवा योजना, सावंतवाडी अंतर्गत अंगणवाडी वाफोली नं. १, बीट बांदा-२ येथे शून्य ते तीन वर्षे वयोगटातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘नवचेतना बाल मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले. हा मेळावा ग्रामपंचायत वाफोली यांच्या संपूर्ण सहभागातून आयोजित करण्यात आला. नवचैतन्य उपक्रमांतर्गत या मेळाव्यात आठ माहितीपर स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलच्या माध्यमातून बालकांची वाढ, विकासाचे विविध टप्पे आणि विकास पत्रकाद्वारे बालकांच्या विकासाचे निरीक्षण याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
बालकांच्या आयुष्यातील पहिले तीन वर्षे शारीरिक, बौद्धिक, भाषिक, सामाजिक व भावनिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतात. या वयोगटातील बालकांच्या विकासाबाबत पालकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, विकासाचे टप्पे समजावून सांगणे आणि बालकांच्या प्रगतीचे नियमित निरीक्षण करण्याचे महत्त्व पटवून देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. विविध स्टॉलच्या माध्यमातून पालकांना बालकांच्या वयानुसार विकासाची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला वाफोली गावचे सरपंच श्री. उमेश शिरोडकर, उपसरपंच श्री. विनेश गवस, ग्रामपंचायत सदस्य साक्षी शिरोडकर, पर्यवेक्षिका श्रीमती छाया घाडीगावकर, श्रीमती ममता देसाई व श्रीमती सोनाली जाधव, केंद्रप्रमुख श्री. अमोल पाटील, प्रथम संस्थेच्या जिल्हा समन्वयक श्रीमती अंकिता लोखंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सत्यवान सावंत आणि मुख्याध्यापिका श्रीमती शुभेच्छा सावंत उपस्थित होते.
तसेच अंगणवाडी सेविका श्रीमती सुवर्णा नारायण नाईक, अंगणवाडी सेविका श्रीमती तृप्ती संतोष परब, वाफोली गावातील अंगणवाडी मदतनीस आणि बीट बांदा-२ मधील सर्व अंगणवाडी सेविका या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
नवचेतना बाल मेळाव्याच्या माध्यमातून बालकांच्या विकासासाठी ग्रामपंचायत, अंगणवाडी, पालक आणि समुदाय यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या वाढीचे नियमित निरीक्षण, योग्य पोषण, प्रेमळ संगोपन आणि वयानुरूप खेळ व संवाद यांचे महत्त्व या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले.
