२ लाख २० हजारांची ४६ बॉक्स गोवा बनावटीची दारू जप्त…

मालवण दि प्रतिनिधी
मालवण, तालुक्यातील देवबाग येथे अवैध दारू विक्री विरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूचे तब्बल ४६ बॉक्स जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या या दारूची एकूण किंमत २ लाख २० हजार ८०० रुपये आहे. काल रात्रीच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली.
देवबाग परिसरात बेकायदेशीरपणे गोवा बनावटीच्या दारूची विक्री आणि साठवणूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून ही धडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला. या प्रकरणी कॅलीस डॉमिनिक डिसोझा (रा. देवबाग, ता. मालवण) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या धाडीत पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत, हेड कॉन्स्टेबल सुहास पांचाळ, हेड कॉन्स्टेबल सुप्रिया पवार तसेच हेड कॉन्स्टेबल सोनाली पाटकर यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.
किनाऱ्यालगतच्या भागात अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून स्थानिक नागरिकांमधून पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले जात आहे.
